कार्यकारी संस्था

'स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था'

मराठवाड्याच्या विकासावर सर्वंकष चर्चा घडवणे आणि विकासाची दिशा ठरविणे यासाठी 'स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था' स्थापन करण्यात आली.  लोकाभिमुख आणि संशोधनपूरक कृती कार्यक्रमांना चालना देणे आणि संशोधनवृत्ती वाढीस लावणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. 

पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण, कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री काणी या सर्वांच्या प्रयत्नाने १९७४ मध्ये हैदराबादेत मूळ संस्था स्थापन झाली. कालांतराने तीन राज्यात वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या गेल्या आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेची महाराष्ट्र राज्यात कायद्यांतर्गत नोंदणी केली गेली. संस्थेचे मुख्य कार्यालय छत्रपती संभाजीनगर स्थापन करण्यात आले. 

पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था स्थापन झाली. स्वामीजींचे आदर्श मूल्यांचे संवर्धन, मुक्तिसंग्रामच्या काळातील ऐतिहासिक दस्तावेजांचे जतन,  संवर्धन, संशोधन, प्रदेशाच्या सर्वकष विकासाच्या दृष्टीने विविध कार्यक्रम आखणे,  संशोधन प्रकल्प राबवणे, राज्य शासनापर्यंत पोहचवणे, चर्चा घडवून आणणे आणि विकासाला चालना मिळावी यासाठी प्रयत्न करणे यासाठी संस्था झटत आहे. संस्थेचे कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत:


'योगेश्वरी शिक्षण संस्था, अंबाजोगाई'

अंबाजोगाई येथील काही प्रतिष्ठित नागरिकांनी जून १९१७ मध्ये 'श्री योगेश्वरी नूतन विद्यालय' या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेची स्थापना केली. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रयत्नाने शाळेचा विस्तार होऊन १९३५ मध्ये माध्यमिक शाळेची स्थापना झाली. स्वामीजींच्या प्रेरणेने जून १९५६ मध्ये संस्थेने  'श्री योगेश्वरी विज्ञान महाविद्यालय' उघडले. पुढे आर्ट्स आणि कॉमर्स शाखेचे स्वतंत्र महाविद्यालय सुरू करण्यात आले तर संस्थेने तांत्रिक शिक्षणासाठी जून २०११ मध्ये पॉलिटेक्निक सुरू केले. सिव्हिल इंजिनीअरिंग, संगणक अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल अभियांत्रिकी आणि यांत्रिक अभियांत्रिकी हे विषय पॉलिटेक्निक मध्ये शिकवले जातात. संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची देखील सोय आहे. 

स्वामीजींनी जोपासलेल्या या रोपट्याचे आता महावृक्षात रूपांतर झाले आहे. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि कन्या शाळा या शालेय शिक्षण देणाऱ्या संथांत ६,००० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर १५० हून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. महाविद्यालयाच्या आर्ट्स, कॉमर्स आणि शास्त्र शाखेत ३,००० तर पॉलिटेक्निक मध्ये ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण संस्थेचा विस्तार ४२.५ एकर भूखंडात पसरलेला आहे. 

१७ सप्टेंबर २०२३ रोजी हैदराबाद स्वातंत्र्य युद्धाच्या सांगतेला ७५ वर्षें पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधून संस्थेने ‘पूज्य स्वामी रामानंद तीर्थ व हैदराबाद मुक्तिसंग्राम स्मृती स्थळाची’ स्थापना केली. स्वामीजींचा पुतळा तसेच हैद्राबादच्या मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांचा स्मृतिस्तंभ बांधण्यात आला. मराठवाड्याचा स्वातंत्र्य संग्राम आणि समग्र इतिहास दर्शवणारे प्रदर्शन स्मृतिस्थळी तयार करण्यात आले. स्वामी रामानंद तीर्थ आणि हैदराबाद मुक्ती संग्रामाचा इतिहास जतन करणे आणि तो नवीन पिढीपर्यंत पोचवणे हा या प्रकल्पामागे हेतू आहे.