भाग - २ (1934 -1948)
"लोकांचा आश्रय मिळवण्यात ज्या संस्था अयशस्वी होतात त्या संस्थांना सार्वजनिक संस्था म्हणून राहण्याचा अधिकार उरत नाही. एखाद्या संस्थेला जी वार्षिक वर्गणी मिळते ती त्या संस्थेच्या लोकप्रियतेची आणि व्यवस्थापक मंडळाच्या प्रामाणिकपणाची कसोटी असते."
स्वामी रामानंद तीर्थ
८. श्री योगेश्वरी नूतन विद्यालय (1935-1938)
हिप्परगा येथील वास्तव्यात स्वामीजींना मनःशांती लाभली. कामाचे स्वरूप आणि दिनचर्या एखाद्या योग्याला अनुरूप अशी होती. परंतु स्वामीजींचा जन्म जनसेवेसाठी आणि देशसेवेसाठी झाला होता. देशात स्वातंत्र्याचे वारे वाहत असताना त्या अचल वातावरणात स्वामीजींचे मन गुदमरू लागले. देशसेवेच्या कार्यात स्वतःला अर्पण करण्याचे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. स्वामीजींचा स्वभाव जाणणाऱ्या त्यांच्या मित्रांनी देखील त्यांना तोच सल्ला दिला. स्वामीजींनी त्यांचे कार्यक्षेत्र वाढवावे आणि लोकांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एकत्र करावे असा या मित्रांचा स्वामीजींना आग्रह होता. त्यातच हिप्परगा येथे काही अनिष्ट घटना घडल्या. स्वामीजींचे हिप्परगा येथील मन उडाले. सर्वांगीण विचार करून अखेर हिप्परगा येथून मोमिनाबाद या तालुक्याच्या गावी स्थलांतर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. (स्वातंत्र्यानंतर मोमिनाबादचे नाव बदलून अंबाजोगाई असे करण्यात आले.) मार्च १९३५ मध्ये स्वामीजी मोमिनाबादला आले.
स्वामीजींबरोबर त्यांचे घनिष्ट सहकारी देखील त्यांच्याबरोबर मोमिनाबाद येथे आले. सर्व सहकाऱ्यांनी मिळून तेथे एक हायस्कूल सुरु करण्याचा निर्णय घेतला. मोमिनाबाद मध्ये एक सरकारी प्राथमिक शाळा होती. त्याचबरोबर योगेश्वरी विद्यालयाची प्राथमिक शाळा देखील अस्तित्वात होती. गावकऱ्यांनी गावात माध्यमिक शाळा सुरु करावी यासाठी सरकारकडे अर्ज केले होते. परंतु सरकारने यावर पुढे काही हालचाल केली नव्हती. ग्रामस्थांनी स्वामीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची कल्पना उचलून धरली. स्वामीजी स्वतः संन्यासी होते. त्यांना दोन वेळचे अन्न आणि निवारा यापलीकडे कशाची आवश्यकता नव्हती. परंतु त्यांचे इतर १२ सहकारी होते. बाकीचे सहकारी संसारी होते. त्यांना संसार चालवण्यासाठी मिळकतीची आवश्यकता होती. गावातील काही मित्रांनी दरमहा १०० रुपये गोळा करण्याची जबाबदारी घेतली. यात संस्थेचा कारभार चालवण्याचे ठरले. हिप्परगा येथील शाळेत काम करणारे त्यांचे सहकारी स्वामीजींना या नवीन उपक्रमात हातभार लावण्यासाठी आले होते. यात बाबासाहेब परांजपे, नरसिंगराव भातंबरेकर, बाबुराव कानडे, शिरीष देशपांडे, विशुभाऊ तावशीकर आणि अ. भा. भोसले यांचा समावेश होता.
खर्चाची तरतूद करण्यात आली. परंतु विषय तिथेच संपणारा नव्हता. त्याकाळी निजाम राज्यात शासनाची परवानगी घेतल्याशिवाय कोणतीही खासगी शैक्षणिक संस्था सुरू करता येत नसे. आणि सरकार अशी परवानगी सहसा देत नसे. परवानगी मिळणार नाही याची स्वामीजींना खात्री झाली. परवानगीशिवाय शाळा सुरु करावी तर या परिस्थितीत पालक आपल्या पाल्यांसाठी शाळेत प्रवेश घेण्याची शक्यता नव्हती. या अडचणींवर तोडगा शोधण्यासाठी निजाम राज्याची राजधानी; हैदराबाद मधील तत्कालीन नेत्यांना आणि प्रतिष्ठितांना भेटून त्यांचा सल्ला घ्यावा असे ठरले. स्वामीजी हैदराबाद येथे पोहोचले. अनेक प्रतिष्ठितांचे दार स्वामीजींनी ठोठावले. सर्वांनी स्वामीजींच्या कल्पनेचे स्वागत केले परंतु कोणीही साजेसा सल्ला स्वामीजींना देऊ शकले नाही. सर्व ठिकाणी स्वामीजींच्या पदरी निराशाच आली. परिस्थितीवर तोडगा निघण्याची चिन्हे दिसेनात तेव्हा शाळा मोमिनाबाद येथे न काढता संस्थानाच्या सीमेवर इंग्रज राज्याच्या हद्दीत काढावी असा देखील विचार स्वामीजींच्या मनात येऊन गेला. इंग्रज राज्यात खाजगी शाळा काढणे त्यामानाने सोपे होते.
परंतु ही वेळ स्वामीजींवर आली नाही. वामनराव नाईक यांचा त्याकाळी समाजावर मोठा प्रभाव होता. वामनराव नाईकांना मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळांबाबत आस्था होती. वामनरावांना भेटावे असा सल्ला काहींनी स्वामीजींना दिला. मोठ्या आशेने स्वामीजी वामनराव नाईकांना त्यांच्या बेगमपेठच्या घरी भेटायला गेले. वामनरावांनी स्वामीजींचा प्रस्ताव शांतपणे ऐकून घेतला. त्यावर वामनराव म्हणाले,
“प्रस्ताव अतिशय स्तुत्य आहे. आज समाजाला या प्रकारच्या शिक्षण संस्थांची आवश्यकता आहे. परंतु शासनाच्या अवाजवी धोरणाने हे आजमितीला अशक्य आहे. या शासकीय निर्देशाचा मी चांगला अभ्यास केला आहे. यात एक पळवाट आहे. राज्यात शासनाची परवानगी घेतल्याशिवाय कोणतीही खाजगी शैक्षणिक संस्था सुरू करता येणार नाही असा हा निर्देश आहे. परंतु एखादी चालू शिक्षण संस्था आपल्या शाळेत माध्यमिक शिक्षणाचे वर्ग सुरु करत असेल तर त्याबाबत हा निर्देश अस्पष्ट आहे. मोमिनाबाद मध्ये ‘श्री योगेश्वरी नूतन विद्यालय’ अस्तित्वात आहे. या शाळेअंतर्गत तुम्ही माध्यमिक शिक्षण वर्ग सुरु केले तर कदाचित यासाठी सरकार परवानगी नाकारू शकणार नाही. परंतु यात मोठा धोका देखील आहे. सरकारने परवानगी नाकारली तर विद्यार्थ्यांचे नुकसान तर होईलच परंतु तुमच्यावर देशद्रोहाची कारवाई होऊ शकते”
स्वामीजींना हा सल्ला अतिशय मोलाचा वाटला. स्वामीजींना श्री योगेश्वरी नूतन विद्यालयाबाबत चांगली माहिती होती. कृष्णाजी चौसाळकर, कैलासवासी शिवाजीराव चौसाळकर आणि कैलासवासी सदाशिवराव जोशी आदींनी १९१७ मध्ये मोमिनाबाद येथे या शाळेची स्थापना केली होती. शाळा काढण्यामागे संस्थापकांचा उद्देश चांगला होता. परंतु शाळा चालवणाऱ्या खंबीर नेतृत्वाची कमी होती. त्यामुळे नावापुरते जेमतेम दहा ते बारा विद्यार्थी पटावर होते. शाळा जरी डबघाईला आलेली होती तरी सरकारी कागदोपत्री ही शाळा अस्तित्वात होती. स्वामीजी मोमिनाबादला परत आले. त्यांनी शाळेच्या संचालकांशी संपर्क साधला. काहीतरी चांगले घडले तर चांगलेच आहे ही त्यांचीही मनस्वी इच्छा होती. त्यांनी स्वामीजींना त्यांच्या प्रकल्पासाठी होकार दिला.
बाबासाहेब परांजपे, देवीसिंग चौहान, ग. धो. देशपांडे, भिमराव खेडगीकर, भातंब्रेकर गुरुजी इत्यादी सहकारी स्वामीजींबरोबर या प्रकल्पात सामील झाले. स्वामीजी आणि त्यांचे सहकारी उत्साहाने कामाला लागले. शाळेसाठी विद्यार्थी जमवण्याच्या कामाला सारे लागले. पालकांना सर्वप्रथम सत्य परिस्थिती समजावून सांगितली. सरकारने शाळेला भविष्यात परवानगी नाकारली तर विद्यार्थ्यांचे एक वर्षाचे नुकसान होईल हा धोका समजावून सांगितला. परंतु त्याबदल्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण घेता येईल. तसेच शिक्षणाची गुणवत्ता राखली जाईल आणि विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार केले जातील याची हमी देखील स्वामीजींनी पालकांना दिली. शंभराहून अधिक पालकांनी पुढे येऊन आपल्या पाल्यांना शाळेत भरती करण्याचे कबूल केले. स्वामीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यात उत्साहाचे वातावरण पसरले. शाळेचा कारभार सुरळीत चालू करण्यासाठी एका व्यवस्थापकीय मंडळाची स्थापना करण्यात आली. गावातील वकील, व्यापारी आणि इतर प्रतिष्ठित व्यक्तींना व्यवस्थापकीय मंडळावर घेण्यात आले. मंडळावरील सदस्यांनी शाळेला सरकारने परवानगी नाकारली तर संभाव्य धोक्यांना तोंड देण्याची तयारी दर्शवली. स्वामीजींनी व्यवस्थापनाची रीतसर नियमावली तयार केली. पाडव्याच्या दिवशी माध्यमिक शाळेचे उदघाटन करण्यात आले.
५ मे १९३५ मध्ये शाळा नव्याने सुरु झाली. शाळेच्या माध्यमिक वर्गांच्या परवानगीचे विनंतीपत्र शिक्षण खात्याकडे सुपूर्द करण्यात आले. शाळेतील वातावरण पाहून अजून अनेक पालक आपल्या पाल्यांना शाळेत भरती करण्यासाठी पुढे आले. पाहता पाहता पटावरील संख्या एक हजाराहून अधिक झाली. संभाव्य धोक्याची कल्पना असूनही सरकारी शाळांमधील शिक्षणाबाबतची अनास्था आणि योगेश्वरी शाळेत दिले जाणारे संस्कार याची तुलना करून पालक हा निर्णय घेत होते. सरकारी शाळेपेक्षा या खाजगी शाळेत फी जास्त असूनही ते हा निर्णय घेत होते.
वेळ पुढे जात होता. परंतु शाळेला परवानगी देण्याच्या अर्जावर शिक्षण विभाग निर्णय घेत नव्हते. शाळा बंद व्हावी हाच त्यांचा हेतू होता. परंतु परवानगी नाकारणे कायद्यात बसत नव्हते. याशिवाय गावात नवीन शाळा प्रतिष्ठा पावली होती. शाळा जबरदस्ती बंद केल्यास समाजात असंतोष निर्माण होण्याची शक्यता होती. यासाठी निर्णय घेण्यात दिरंगाई करण्याचे धोरण शिक्षण खात्याने आखले. संस्थेने माध्यमिक वर्ग बंद करावेत यासाठी शिक्षण खात्याने सरकारी शाळेत माध्यमिक वर्ग सुरु करण्याचा प्रस्ताव मांडला. संस्थेतील मुले सरकारी शाळेच्या पटावर घेण्याचा प्रस्ताव देखील याचा एक भाग होता. परंतु स्वामीजींनी हा प्रस्ताव धुडकावून लावला. स्वामीजींनी निक्षून सांगितले,
“सरकारी शाळेत माध्यमिक वर्ग सुरु करावयाचे असतील तर आम्ही त्याचे स्वागत करू. परंतु संस्थेतील वर्ग बंद करण्यास आम्ही कदापि तयार होणार नाही”
विषय निकालात निघेपर्यंत लढण्याचा निर्णय स्वामीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला. त्यानंतर प्रचंड तणावाचा काळ गेला. पण तिसऱ्या वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यांची पहिली तुकडी एस. एल. सी. परीक्षेला बसण्याच्या थोडे आधी सरकारी विभागाकडून अखेर परवानगी मिळाली. लहान का होईना, परंतु स्वामीजींचा सार्वजनिक जीवनातला हा पहिला विजय होता. सामान्य जनतेला एकत्र आणून सरकारी यंत्रणेवर दबाव आणणे आणि आपले मागणे मान्य करून घेणे, यासाठी लागणारे कौशल्य स्वामीजींनी दाखवले होते. जनमानसात सरकारबद्दल असलेली भीती काही अंशी कमी झाली. शाळेला परवानगी मिळाल्याची बातमी संपूर्ण संस्थानात झाली. अनेक नेत्यांनी आणि प्रतिष्ठितांनी स्वामीजींना अभिनंदनपर निरोप पाठवले. स्वामीजींच्या नावाला संस्थानात ओळख निर्माण झाली.
स्वामीजींचे वास्तव्य मोमिनाबाद मध्ये असताना आणखी काही घटना घडल्या, ज्यामुळे हैदराबाद संस्थानातील राजकीय वर्तुळात स्वामीजींना स्वतःची ओळख मिळाली.
त्याकाळी हैदराबाद संस्थानामध्ये राजकीय सभांना बंदी होती. परंतु शिक्षण विषयक सभा आणि संमेलनांचे नियोजन करणे शक्य असे. संस्थानातील शिक्षण पद्धतीवर चर्चा करण्यासाठी ‘प्रजा शिक्षण परिषद’ ही संस्था स्थापन झाली होती. २० नोव्हेंबर १९३६ रोजी या परिषदेचे तिसरे अधिवेशन श्री. काशिनाथ वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली हैदराबाद येथे भरणार होते. या संमेलनात मॅकेंझी समितीच्या अहवालावर भाषण देण्यासाठी स्वामीजींना आमंत्रण मिळाले. इतकेच नाही तर काशिनाथ वैद्यांनी स्वामीजींना एक आठवडा आधीच हैदराबाद येथे येण्याची विनंती केली. व्यवस्थापक आणि इतर व्यक्तींची ओळख होईल हा त्यामागचा हेतू होता. स्वामीजी एक आठवडा आधीच हैदराबाद येथे येऊन पोहोचले.
संमेलन हे शैक्षणिक विषयावर असले तरी अनौपचारिक बैठकांतून राजकीय चर्चा होत असत. प्रत्येकजण आपल्या दडपलेल्या भावनांना वाव देत असे. स्वामीजींच्या हैदराबादच्या या मुक्कामात त्यांचा मराठवाड्यातील कार्यकर्त्यांव्यतिरिक्त हैदराबाद शहरातील आणि संस्थानाचे तेलगू व कन्नड भाषिक भाग यातील अनेक कार्यकर्त्यांशी परिचय झाला. माडपाटी हनुमंतराव, एम. रामचंद्रराव, कर्नाटकातील जनार्दन देसाई, हैदराबाद शहरातील रामकिशन धूत, जी. रामाचारी, श्रीधर नाईक अशा अनेक व्यक्तींचा परिचय झाला. दिगंबर बिंदू, ए. के. वाघमारे, बाबासाहेब परांजपे, नारायणराव जोशी, अनंतराव कुलकर्णी वगैरे मराठवाड्यातील स्वामीजींचे सहकारी देखील सभेला हजर होते. स्वामीजींचे मॅकेन्झी समितीच्या अहवालावरील भाषण खूप गाजले. भाषणानंतर अनेकांनी स्वामीजींशी संपर्क साधला आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. हैदराबाद संस्थानातील राजकीय वर्तुळात स्वामीजींचे नाव सर्वांना सुपरिचित झाले.
अशीच आणखी एक घटना घडली. १९३६ मध्ये जन्माष्टमीच्या निमित्ताने उस्मानिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी स्वामीजींना विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी आमंत्रित केले. स्वामीजी एक दिवस आधीच हैदराबाद येथे पोहोचले. विद्यापीठाच्या सुसज्ज अतिथीगृहात स्वामीजींची व्यवस्था करण्यात आली होती. आदल्या दिवशी अनेक तरुण स्वामीजींना येऊन भेटले. गैरमुसलमान लोकांशी कसा भेदभाव केला जातो आणि यातून विद्यार्थ्यांना कोणत्या यातना भोगाव्या लागतात याबाबत अनेकांनी स्वामीजींना कल्पना दिली. स्वामीजींनी याबाबत काहीतरी करावे अशी विनंती देखील काहींनी केली. स्वामीजींनी यावर निश्चित विचार करेन असे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले.
संध्याकाळी स्वामीजींचे भाषण झाले. स्वामीजी इंग्रजीतच बोलले. कृष्णाच्या संदेशावर स्वामीजी बोलले. श्रोत्यांमध्ये विद्यापीठातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती होत्या. विद्यार्थी प्रचंड संख्येने हजर होते. या मुक्कामात स्वामीजींचा संस्थानातील विद्यार्थ्यांशी जवळचा संपर्क आला. त्यातील अनेक विद्यार्थी स्वामीजींच्या कार्यात कायमचे जोडले गेले.