भाग - ३  (1948-1972) 





“गृहस्थाकडून नैतिक भंग झाला तर त्याचा परिणाम त्याला एकट्याला भोगावा लागतो. परंतु संन्यासाकडून नैतिक भंग झाला तर त्याचा परिणाम साऱ्या समाजावर होतो” 

१६. अखेरचे पर्व … (1962-1972)

३ ऑक्टोबर १९६३ रोजी स्वामीजी साठ वर्षांचे झाले.  वाढदिवसाच्या दिवशी हैदराबाद मध्ये स्वामीजींच्या अभिष्टचिंतनासाठी कार्यक्रम ठेवला गेला. राजकीय मतभेद विसरून कार्यक्रमाला मवाळ आणि जहाल काँग्रेस नेते तसेच कम्युनिस्ट नेते देखील हजर होते. प्रत्युत्तरात स्वामीजींनी अतिशय भावपूर्ण भाषण केले.  त्यानंतर औरंगाबाद,  गुलबर्गा, मोमिनाबाद आणि मराठवाड्यातील इतर ठिकाणी स्वामीजींच्या अभिष्टचिंतनासाठी कार्यक्रम ठेवले गेले. मराठवाड्यातील नेते आणि अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमांना आवर्जून हजर होते.  स्वामीजींच्या ६० व्या वर्षी विनोबा भावे यांनी शुभेच्छा पाठवल्या :

“स्वामीजींनी प्रत्यक्ष संन्यस्त जीवनाने आमच्यासमोर एक आदर्श ठेवला आहे. श्रीमद् शंकराचार्यांनी ‘वसंतवत लोकगीतं चरन्त:’ असे संन्यासी पुरुषांचे वर्णन केले आहे. त्यानुसार स्वामीजींनी शैक्षणिक सामाजिक, राजनीतिक आणि विधायक अशा सर्व क्षेत्रांमध्ये आजपर्यंत सेवा-कार्य केले आहे व आजही करीत आहेत. दिवसेंदिवस त्यांची संन्यस्तवृत्ती अधिकाधिक उज्वल होत जावो व त्यांना पूर्ण जीवन प्राप्त होवो.” 

सक्रिय राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर स्वामीजींनी स्वतःला विधायक कामात गुंतवून घेतले. स्वातंत्रोत्तर काळात स्वामीजींचा बहुतांशी वेळ राज्याचे त्रिभाजन आणि स्थानिक राजकारण यात गेला असला तरी त्यांनी आपले विधायक कार्य अव्याहत चालू ठेवले होते. 

मराठवाड्यात खादी उत्पादन चळवळ सुरु करण्यात आणि ती वाढवण्यात स्वामीजींचे फार मोठे योगदान होते. १५ एप्रिल १९५१ मध्ये स्वामीजींच्या अध्यक्षतेखाली ‘हैदराबाद खादी समिती’ निर्माण करण्यात आली. खादीचा उपयोग आणि त्याचे पुरेसे उत्पादन मराठवाड्यात व्हावे यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. यातून अनेक कामगारांना रोजगार मिळाला. औरंगाबाद, उमरगा, नांदेड, बीड, उदगीर अशा मराठवाड्यातील अनेक शहरातून खादी  उत्पादनाचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरु झाले. 

समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शिक्षणाचा प्रसार अत्यंत महत्वाचा आहे हे स्वामीजींनी जाणले होते. मराठवाड्यात शिक्षण संस्थांची उभारणी आणि त्यांची वाढ याकडे स्वामीजींनी विशेष लक्ष दिले. 

हैदराबाद राज्य भारतात विलीन झाले तेव्हा मराठवाड्यात इंटरपर्यंत शिक्षण देणारे एकमेव महाविद्यालय औरंगाबाद येथे होते. सर्वप्रथम औरंगाबादमध्ये पदवी शिक्षण मिळेल याची व्यवस्था करण्यात स्वामीजींनी विशेष लक्ष दिले. त्यानंतर औरंगाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरु व्हावे यासाठी स्वामीजींनी प्रयत्न केले. १९५६ पर्यंत मराठवाडा हैदराबाद राज्यात होता. त्याआधीच स्वामीजींचे यासाठी प्रयत्न चालू होते. स्वामीजींच्या प्रयत्नांना यश येऊन १९५८ मध्ये औरंगाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ अस्तित्वात आले. मराठवाडा यावेळी मुंबई राज्यात आला होता.  औरंगाबाद मराठवाड्यातील विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाऊ लागले. यात स्वामीजींचा फार मोठा वाटा आहे. 

मोमिनाबाद येथे योगेश्वरी नूतन विद्यालयाचा विस्तार १९३५ तर स्वामीजींनीच केली होती. त्यांच्या पश्चात स्वामीजींच्या सहकाऱ्यांनी शिक्षण संस्था चांगली चालवली, इतकेच नव्हे तर ती नावारूपाला आणली. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील आपल्या धकाधकीच्या जीवनात ते संस्थेशी संपर्क राखून होते.  स्वामीजींच्या सूचनेवरून मोमिनाबादच्या शिक्षण संस्थेमध्ये १९५६ मध्ये विज्ञान महाविद्यालय सुरू केले. पुढे आर्ट्स आणि कॉमर्स शाखेचे स्वतंत्र महाविद्यालय सुरू करण्यात आले.

मराठवाड्यात इतर ठिकाणी देखील उच्च शिक्षणाची सोय होईल यासाठी स्वामीजींनी प्रयत्न केले. नांदेड येथे पीपल्स कॉलेज, आयुर्वेद महाविद्यालय तर परभणी येथे कृषी महाविद्यालय आणि लातूर येथे तंत्रनिकेतनाची स्थापना स्वामीजींच्या प्रयत्नाने झाली. स्वामीजींची नांदेडला अनेकवेळा चक्कर होत असे. मुक्कामात स्वामीजी शिक्षकांशी आणि विद्यार्थ्यांशी संपर्क साधत. शैक्षणिक सुविधांबरोबर शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी यासाठी देखील स्वामीजींचे प्रयत्न असत. 

स्वामीजींची विधायक कार्ये चालू असली तरी त्यांच्या मनाची ओढ आता अध्यात्माकडे झेपावू लागली. आपले अध्यात्मिक गुरु स्वामी रामतीर्थ यांच्या शिकवणीकडे ते पुन्हा आकर्षित होऊ लागले. १९६४ मध्ये आंध्र प्रदेशात काकीनाडापासून जवळच असलेल्या पिठापुरम येथील रामतीर्थांच्या शांती-आश्रमाकडे स्वामीजींनी प्रयाण केले. त्यांचे पुढील वास्तव्य बरेचसे आश्रमातच होते. खादी समितीच्या कामासाठी हैदराबादला आणि योगेश्वरी नूतन विद्यालयाला भेट देण्यासाठी मोमिनाबादला स्वामीजी अधून मधून प्रवास करत. 

आश्रमात असताना स्वामीजींनी शिक्षण क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. ‘स्वामी रामतीर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पीस’ या नावाने एक संस्था सुरु केली. या संस्थेची स्थापना  २१ जानेवारी १९६७ रोजी स्वामी ओंकारांच्या जन्मदिनी केली. विद्यालयासाठी शांती आश्रमाने २१ एकर जमीन देऊ केली.  या संस्थेचे उद्घाटन श्री जयप्रकाश नारायण यांच्या हस्ते करण्यात आले. देशातील समाजसेवा करू इच्छिणाऱ्या तरुणांना एकत्रित आणावे, त्यांच्यावर विज्ञान आणि अध्यात्म यांचे संस्कार करावेत या दिशेने स्वामीजी या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करीत होते. या संस्थेचा अभ्यासक्रम स्वामीजींनी जयप्रकाश नारायण आणि विनोबाजी यांच्याशी चर्चा करून तयार केला. तीन महिने व एक वर्ष कालावधीचे वर्ग सुरू करण्यात आले. स्वामीजी संस्थेच्या  व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होते. परंतु ते स्वतः या वर्गांमध्ये व्याख्यानेही देत असत. 

१९६८ मध्ये स्वामीजींची प्रकृती बिघडली. उपचारासाठी ते काही दिवस हैदराबादला गेले. प्रकृती सुधारली परंतु शरीराच्या कुरबुरी चालू राहिल्या. ऑगस्ट १९७१ मध्ये स्वामीजींना हृदय विकाराचा झटका आला. हैदराबादच्या उस्मानिया इस्पितळात स्वामीजींवर उपचार केले गेले. त्यानंतर काही दिवस मोमिनाबाद येथे आराम करून स्वामीजी आश्रमात परत आले. काही दिवसांनी स्वामीजींना पुन्हा अस्वस्थ वाटू लागले. उपचारासाठी त्यांना पुन्हा हैदराबाद येथे उस्मानिया इस्पितळात हलवण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. स्वामीजींच्या बरे होण्याची चिन्हे दिसेनात. राज्यपाल खंडूभाई देसाई, मुख्यमंत्री पी. व्ही. नरसिंहराव, मेलकोटे,  दिगंबर बिंदू वगैरे मंडळी हॉस्पिटल मध्ये स्वामीजींना भेटून जड अंतकरणाने परत गेली.

२२ जानेवारी १९७२, दुपारची ३.३० ची वेळ. स्वामीजींनी अखेरचा श्वास सोडला. स्वामीजींची प्राणज्योत मालवली. २३ तारखेला सकाळी स्वामीजींची अंत्ययात्रा निघाली. खादी भांडारातून निघालेली स्वामीजींची अंत्ययात्रा रेसिडेन्सी, फतेमैदान, खैरताबाद मार्गे बेगमपेठला पोहोचली. 

आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र प्रदेशातील स्वातंत्र्यलढ्यातील जुने सहकारी शोकाकुल भावनेने अंत्ययात्रेत सहभागी झाले. बेगमपेठ येथे स्वामीजींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आंध्रप्रदेश सरकारने हा अंत्यविधी सरकारी इतमामात केला. आंध्र मंत्रिमंडळातील अनेक मंत्री यावेळी हजर होते.