भाग - १ (1903-1934) 





“या क्षणापासून मी स्वतःला संपूर्णपणे मातृभूमीच्या सेवेसाठी समर्पित करत आहे. मी ध्येयाच्या मार्गाने जाईन आणि आयुष्यभर ब्रह्मचारी राहीन .”

२. देशप्रेम (1916-1920)

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते.   १९०५ मध्ये ब्रिटिशांनी धर्माच्या आधारावर बंगालची फाळणी केली. ब्रिटिशांची ही ‘फोडा आणि झोडा’ राजनीती आहे हे स्पष्ट होते. यातून संपूर्ण देशात असंतोष भडकला. यातूनच लोकमान्य टिळकांचे नेतृत्व पुढे आले. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतुःसूत्रांचा त्यांनी पुरस्कार केला. संपूर्ण देशातील तरुणांना प्रेरित करण्यात लोकमान्य टिळक यशस्वी झाले. 

१९१४ ते १९१८ या काळात पहिल्या महायुद्धाने साऱ्या जगाला ग्रासले. ब्रिटनने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. ब्रिटनने भारतीय जनतेला नाहक युद्धात खेचले. अनेक भारतीय जवानांना आघाडीवर तैनात करण्यात आले. यात अनेक भारतीय जवान मरण पावले. अनेक जखमी झाले. युद्धात लागणारी सामग्री, धान्य, जूट इत्यादी भारतातून निर्यात केले गेले. अमाप भारतीय संपत्ती लयाला गेली. पहिले महायुद्ध मित्र राष्ट्रांच्या विजयाने संपले. भारताने ब्रिटिशांना सर्वतोपरी मदत केली होती आणि हजारो मातीच्या सुपुत्रांनी सैन्यात भरती होऊन युद्धात आपल्या प्राणांची आहुती दिली होती. परंतु भारताला त्याचा काहीही उपयोग झाला नाही. 

महायुद्धामध्ये भारताने केलेल्या मदतीच्या बदल्यात स्वशासन मिळावे अशी अपेक्षा भारतीय नेत्यांनी केली होती. यासाठी १९१५ च्या सुमारास डॉ. ॲनी बेझंट यांनी होमरूलची मागणी केली. टिळक यांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली होती. त्यांनी होमरूल चळवळ उचलून धरली. याचे प्रत्यंतर म्हणून ‘माँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा १९१९’ लागू केला. ब्रिटीश सरकारने प्रथमच जाहीर केले की त्यांना भारतात जबाबदार सरकार आणायचे आहे. प्रांतामध्ये द्विदल राज्यपद्धती आस्तित्वात आली. प्रांतीय कायदेमंडळात ७०% भारतीयांना प्रवेश देण्यात आला. परंतु १९१९ चा कायदा हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका लोकमान्य टिळकांनी केली.

  १९१९ मध्ये ब्रिटिश सरकारने ‘अराजकीय आणि क्रांतिकारी गुन्हे कायदा’ किंवा ‘रौलेट कायदा’ लागू केला. या कायद्यान्वये पोलिसांना कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा अधिकार मिळाला. देशातील वाढत्या राष्ट्रवादी उठावाला आळा घालणे हा या कायद्याचा मूळ उद्देश होता. महात्मा गांधींनी या कायद्याचा जोरदार विरोध केला. देशातील जनतेला या कायद्याच्या विरोधात संघटित केले. सप्टेंबर १९२० मध्ये नागपूर येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात ब्रिटिश साम्राज्याच्या विरुद्ध राष्ट्रीय काँग्रेसने असहकार चळवळ पुकारली. चळवळीच्या धोरणाबाबत देशवासियांना पुढील आवाहन करण्यात आले: 

“असहकार चळवळ अहिंसक असावी. भारतीयांनी त्यांच्या पदांचा सरकारी नोकरीतून राजीनामा द्यावा. सरकारी शैक्षणिक संस्था, न्यायालये, सरकारी सेवा, परदेशी वस्तू, निवडणुका यावर बहिष्कार टाकावा आणि कर भरण्यास नकार द्यावा.”

गांधीजींनी मुसलमान धर्मियांच्या खिलाफत चळवळीला समर्थन दिले होते. परिणामी मुसलमान समाजाने असहकार चळवळीला संपूर्ण पाठिंबा दिला. त्यामुळे ही चळवळ देशव्यापी झाली. यातूनच महात्मा गांधींचे नेतृत्व देशात पुढे आले.

  १९१६ ते १९२० चा तो काळ. व्यंकटेश सोलापूर येथे नॉर्थकोट हायस्कूल या सरकारी शाळेत शिकत होता. देशात घडणाऱ्या या घटनांचा व्यंकटेशच्या बालमनावर परिणाम होत होता. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीचा मनस्वी तिटकारा व्यंकटेशच्या मनात तयार होत होता. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाने व्यंकटेश भारावून गेला होता. 

व्यंकटेशची शाळा सरकारी असल्याने मुलांसमोर ब्रिटिश सरकारचे गुणगान वेळोवेळी गायले जात असे. पहिले महायुद्ध चालू होते. सोलापूरचे जिल्हाधिकारी स्वतः दर आठवड्याला शाळेला भेट देत असत आणि खास तयार केलेल्या नकाशांच्या सहाय्याने युद्धाची प्रगती सांगत. जर्मनांचे अत्याचार आणि मित्रपक्षाची युद्धात होत असलेली सरशी हे सांगण्यावर त्यांचा सारा भर असे. मुलांना ‘गॉड सेव्ह किंग’ ची प्रार्थना म्हणावयाला लावत. मुलांना ब्रिटिश झेंड्याकडे तारणहार म्हणून पाहून त्याला मानवंदना द्यावी लागत असे. 

व्यंकटेशला गुलामगिरीच्या या वातावरणाचा उबग येत असे. एकदा ब्रिटनचा राजा जॉर्ज VI यांच्या सहकारदिनी मुलांना ब्रिटिश झेंडा आणि मिठाई वाटण्यात आली. व्यंकटेश आणि काही मुलांनी मिठाई खाल्ली आणि ब्रिटिश झेंडा वर्गातच टाकून दिला. शिक्षकांना हा प्रकार जेव्हा कळला तेव्हा त्यांनी हे ‘देशद्रोही’ कृत्य करणाऱ्या प्रत्येक मुलाला छड्यांचा मार दिला. या बंडखोरीने व्यंकटेश मात्र मनोमन सुखावला. त्याला तो छड्यांचा मार खाण्यात उलट आनंदच झाला. 


साम्राज्यवादी वातावरणाची जाणीव करून देणारा आणखी एक प्रसंग मोठा बोलका आहे.  सी. एन. नाबर हे त्याकाळी शाळेचे मुख्याध्यापक होते. नाबर स्वतः मनाने दयाळू असले  तरी ते  ब्रिटिश सरकारशी मात्र एकनिष्ठ होते. त्यासुमारास एकदा लोकमान्य टिळकांनी सोलापूरला भेट दिली. सकाळी टिळक रेल्वेने सोलापुरात येणार होते. त्यानंतर संध्याकाळी त्यांची शहरात सार्वजनिक सभा होती. मुख्याध्यापकांनी मुलांना सक्त ताकीद दिली. टिळकांना पाहण्यासाठी रेल्वे स्थानकावर जाण्यास किंवा त्यांच्या संध्याकाळच्या सभेला उपस्थित राहण्यास मुलांना सक्त मनाई केली गेली. व्यंकटेशला लोकमान्यांबद्दल नितांत आदर होता. व्यंकटेश आणि त्याच्या काही मित्रांना टिळकांचे दर्शन घेण्याचा मोह आवरला नाही. सारे मित्र सकाळी रेल्वे येण्याअगोदरच स्थानकावर पोहोचले. टिळक रेल्वेतून उतरले. त्यांचे लोकांनी जंगी स्वागत केले. टिळकांच्या झालेल्या दर्शनाने व्यंकटेश धन्य झाला. परंतु ही बातमी मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचली. अर्थातच व्यंकटेशला आणि मित्रांना छड्यांचा प्रसाद मिळाला आणि तो त्यांनी आनंदाने स्वीकारला. 

संध्याकाळच्या सभेला मुले पोहोचणार नाहीत याची मात्र मुख्याध्यापकांनी संपूर्ण तयारी केली. तो शनिवार होता.  शनिवारी सहसा शाळा दुपारी दोन वाजता सुटत असे. त्यादिवशी सकाळी अकरा वाजता ‘चाचणी परीक्षा’ होती. सकाळची चाचणी परीक्षा आटोपून संध्याकाळच्या टिळकांच्या सभेला उपस्थित राहणे मुलांना सहज शक्य होते. परंतु मुख्याध्यापकांनी परीक्षेची वेळ बदलून दुपारी तीन वाजता केली. जेणेकरून मुले संध्याकाळी टिळकांच्या जाहीर सभेला उपस्थित राहणार नाहीत. परंतु व्यंकटेश आणि मुलांनी एक योजना आखली. तीन वाजता हातात प्रश्नपत्रिका मिळताच मुलांनी  ज्या प्रश्नांची उत्तरे सहज देता येतील त्या प्रश्नाची उत्तरे लिहिली आणि पास होण्यापुरते मार्क मिळतील तितकेच प्रश्न सोडवले. उत्तरपत्रिका परत देऊन सभेत सामील होण्यासाठी व्यंकटेश आणि मित्र पसार झाले. 

दुसऱ्या दिवशी जेव्हा मुख्याध्यापकांना प्रकार कळला तेव्हा त्यांच्या रागाला पारावार उरला नाही. सभेला गेलेल्या मुलांना अपेक्षेप्रमाणे छड्यांचा मार मिळाला. टिळकांना ऐकण्याची संधी मिळाली होती त्या बदल्यात ही शिक्षा व्यंकटेशने आनंदाने सहन केली. या प्रकरणाची वाच्यता सरकारदरबारी देखील पोहोचली. पुढे मुख्याध्यापकांच्या निष्ठेच्या कृत्याबद्दल बक्षीस म्हणून त्यांची बढतीवर बदली झाली. इकडे देशभक्तीपर कर्तव्य पार पाडल्याच्या भावनेने मुलांची   चिमुकली मने आनंदित झाली.  

पहिले महायुद्ध संपले तेव्हा मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांनी युद्धबंदीबाबत जनतेला माहिती देण्यासाठी  सोलापूरला भेट दिली. ते जाहीर सभेला संबोधित करणार होते.  ज्यांची ब्रिटीश सरकारवर निष्ठा होती अशाच काही विशेष अधिकाऱ्यांना सभेच्या प्रवेशाचे पास दिले गेले. हायस्कुलातून काही विद्यार्थ्यांना देखील सभेला पाठवण्याचे निमंत्रण मिळाले. ज्या विद्यार्थ्यांना सभेला जाण्यासाठी निवडले त्यात व्यंकटेशाचे नाव होते. व्यंकटेशने गव्हर्नर साहेबांचे भाषण लक्ष देऊन ऐकले. परंतु त्याचा कोणताही प्रभाव व्यंकटेशवर झाला नाही. उलटपक्षी, शहरातील काही उच्चभ्रू लोकही त्यावेळी बोलले. त्यांच्या भाषणातून प्रकट होणारी गुलामगिरीची मानसिकता पाहून व्यंकटेशाचे मन उद्विग्न झाले.  

राजकारणातील बदलत्या परिस्थितीची जाणीव व्यंकटेशला झाली. देशाच्या राजकारणात आणि जागतिक राजकीय परिस्थिती समजावून घेण्यासाठी व्यंकटेश अनेक पुस्तके, लेख, बातम्या वाचू लागला. देशात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा व्यंकटेशवर परिणाम होत होता. त्यातून त्याचे विचार प्रगल्भ होत होते. मातृभूमीच्या मुक्तीसाठी स्वतःला झोकून देण्याचे विचार वारंवार व्यंकटेशच्या मनात येत होते.  व्यंकटेशच्या आजूबाजूला त्याचे मित्र भविष्यातील करिअर बद्दल मनमोहक कल्पना मांडताना दिसत होते. काहींना ICS परीक्षा पास होऊन सरकारी नोकरीत मोठ्या हुद्यावर काम करण्याची इच्छा होती तर काही परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे मनसुबे रचत होते. परंतु व्यंकटेशची तशी इच्छा नव्हती. एकतर महागडे शिक्षण व्यंकटेशला परवडणारे नव्हते. परंतु व्यंकटेश आपल्या अंतरात्म्याला वेगळेच प्रश्न विचारात होता,

“मला मातृभूमीच्या सेवेत जीवन अर्पण करायचे आहे. मग मी गृहस्थाश्रम पत्करून कोणाचा तरी पती आणि कोणाचा वडील होणे योग्य आहे का? की माझी संपूर्ण ऊर्जा मातृभूमीसाठी खर्च करून एक आनंदी जीवन जगू? देशभक्ताने मुले निर्माण करणे आणि त्यांची काळजी घेणे इष्ट आहे का?” 

आणि वारंवार व्यंकटेश या निर्णयाला येत असे की चाकोरीतले जीवन जगणे त्याला शक्य नाही. 

काही माणसांच्या आयुष्यात अशी एखादी घटना घडते  ज्याने त्याच्या आयुष्याचा संपूर्ण मार्गच बदलून जातो. हा बदल एखाद्या विशिष्ट घटनेतून उद्भवला असला तरी तो एका  दीर्घ आणि निरंतर प्रक्रियेचा परमोच्च बिंदू असतो. एकदा तो बिंदू गाठला की, त्याच्या जीवनाच्या प्रवाहात आमूलाग्र परिवर्तन होते. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो आणि ती व्यक्ती एक नवीन दिशा घेते. अशीच काहीशी घटना व्यंकटेशच्या आयुष्यात घडली. 

लोकमान्य टिळक मुंबईत आजारी होते. त्यांच्या गंभीर आजाराच्या वृत्ताने संपूर्ण देशावर शोककळा पसरली होती. लोक काळजीच्या स्वरात कुजबुजत होते.  लहान-मोठे नेते, आप्त, शुभचिंतक टिळकांना भेटायला मुंबईला जात होते.   अखेर सर्व वैद्यकीय प्रयत्न अयशस्वी ठरले. सर्वांना ज्याची भीती वाटत होती तो क्षण अखेर आला. १ ऑगस्ट १९२० च्या पहाटे लोकमान्य टिळकांचा अंत झाला. आजारी टिळकांच्या प्रकृतीची माहिती देणारे बुलेटिन जारी केले जात होते. त्यात टिळकांच्या दुःखद मृत्यूची बातमी संपूर्ण देशाला कळवण्यात आली. या बातमीचा व्यंकटेशवर सामान्यापेक्षा जास्त परिणाम झाला. व्यंकटेशच्या मनात काहूर माजले. 

“टिळकांचा मृत्यू झाला. पण त्यांनी दिलेल्या संदेशाचे आणि त्यांनी निर्माण केलेल्या लढ्याचे आता काय होणार? त्यांनी अनेक तरुणांना भारतीय स्वातंत्र्यासाठी स्वतःला समर्पित करण्यासाठी प्रेरित केले. आता या प्रेरित तरुणांचे काय कर्तव्य असेल? मीही त्यातलाच एक आहे. मग मी काय केले पाहिजे?”

व्यंकटेशने दिवसभर उपवास केला. अखेर संध्याकाळी तो एका निर्जन तळ्याकाठी गेला. एकांतात वेळ घालवण्याची व्यंकटेशाची ही नेहमीची जागा होती. तेथे पोहोचल्यावर व्यंकटेशला अश्रू अनावर झाले. तो ओक्साबोक्शी रडू लागला. त्या अवस्थेत किती वेळ गेला हे व्यंकटेशला कळले देखील नाही. थोड्या वेळाने व्यंकटेश शांत झाला. निर्विकार मानाने तो तळ्याकडे एकटक बघत राहिला. संध्याकाळची वेळ होती. सूर्य मवाळतीला आला होता. व्यंकटेश उठला. त्याने तलावाचे पाणी दोन्ही हातात घेतले आणि ते मवाळत्या सूर्याला अर्पण केले आणि निश्चयपूर्वक मनःस्थितीत पुटपुटला: 

“या क्षणापासून मी स्वतःला संपूर्णपणे मातृभूमीच्या सेवेसाठी समर्पित करत आहे. मी ध्येयाच्या मार्गाने जाईन आणि आयुष्यभर ब्रह्मचारी राहीन.” 

तेव्हापासून व्यंकटेशच्या जीवनाचा प्रवाह बदलला. व्यंकटेशने आपल्या जीवनाला ‘सेवा आणि त्यागा’च्या बंधनात बांधून घेतले आणि त्यातून त्याचा अस्वस्थ आत्मा कायमचा सुखावला.