भाग - १ (1903-1934) 





विद्यार्थ्यांबरोबरचा सहवास अतिशय पारदर्शक आणि शुद्ध असतो. त्याने माझा आत्मा समृद्ध होतो. त्यांच्या सेवेत मला दैवी आनंद मिळतो. 


६. हिप्परग्याची शाळा (1929-1934)

निजाम संस्थानात हिप्परगा येथे एका राष्ट्रीय शाळेची स्थापना झाली होती. खेडगीकरांचे मेहुणे; भिमराव म्हणजे त्यांच्या भगिनी कमलाबाई यांचे पती. ते या शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. या शाळेला एका मुख्याध्यापकाची आवश्यकता होती. भीमरावांनी या कामासाठी खेडगीकर यांचे नाव सुचवले. व्यवस्थापनाने ते मान्य करून खेडगीकरांचे स्वारस्य जाणून घेण्यास सांगितले. भीमरावांनी त्या अर्थाचे पत्र खेडगीकर यांना पाठवले. अमळनेर आणि पुणे येथे राष्ट्रीय शिक्षण संस्थांमध्ये खेडगीकर यांचे शिक्षण झालेले असल्याने त्यांना ही कल्पना प्रथमदर्शनी आवडली. मी शाळा पाहण्यास येतो आणि नंतर निर्णय घेतो असे पत्र उत्तरादाखल त्यांनी पाठवले. थोड्याच दिवसात खेडगीकर हिप्परग्याला रवाना  झाले. हिप्परग्याच्या शाळेतील वातावरण आणि कामाचे स्वरूप पाहून खेडगीकरांनी तेथेच काम करण्याचा निर्णय घेतला. ९ जून १९२९ मध्ये खेडगीकर हिप्परग्याच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. ध्यानी मनी नसताना खेडगीकरांनी शिक्षण क्षेत्रात पदार्पण केले. 

हैदराबाद संस्थानातील उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा हे एक छोटेसे खेडेगाव. पंचक्रोशीतल्या कोणत्याही इतर गावाप्रमाणेच हिप्परगा हे देखील अतिशय कमी लोकवस्तीचे शेतीप्रधान गाव होते. परंतु हिप्परग्याचे नाव राज्यभर झाले ते येथे सुरु झालेल्या गुरुकुल तत्वावर चालणाऱ्या राष्ट्रीय शाळेच्या स्थापनेने. 

व्यंकटराव देशमुख आणि त्यांचे धाकटे बंधू अनंतराव यांच्या प्रयत्नातून या शाळेची स्थापना झाली होती. व्यंकटराव तालुक्याच्या गावी वकिली करीत असत. प्रथमपासूनच ते राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होते. आपला भाऊ अनंत यास त्यांनी पुण्यात शिक्षणासाठी ठेवले होते. अनंत हा दत्तक गेल्यामुळे दत्तक वडिलांचे कुलकर्णी हे नाव लावत असे. त्या काळात हैदराबाद संस्थानात जिल्ह्याच्या ठिकाणीच एक सरकारी हायस्कूल असे. शिक्षणाचे माध्यम उर्दू असे. मराठी माध्यमाची आणि विद्यार्थ्यांवर राष्ट्रीय संस्कार करणारी शाळा काढण्याची व्यंकटरावांची इच्छा होती. मोठ्या भावाच्या विचारांनी प्रेरित होऊन अनंतराव देखील या कामात सामील झाले. १९२१ च्या गणेश चतुर्थीस व्यंकटराव व अनंतराव या बंधूंनी हिप्परगा येथे राष्ट्रीय शाळेचा प्रारंभ केला. व्यंकटरावांनी शाळेसाठी मदत गोळा करत आणि लोकसंपर्क ठेवत तर अनंतराव शाळेची अंतर्गत व्यवस्था पाहत. 

संस्थेला अशा व्यक्तीची गरज होती जी शाळेचे दैनंदिन व्यवहार आणि शैक्षणिक बाजू सांभाळेल. तसेच मुलांना राष्ट्रीय शिक्षण दिले जाईल याची योजना करेल.  खेडगीकरांना शिकवण्याचा अनुभव नसला तरी राष्ट्रीय शिक्षण संस्थांचे कामकाज त्यांनी अमळनेर आणि पुणे येथे जवळून पहिले होते. खेडगीकरांनी मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारला. कामाचा मोबदला काय असावा अशी विचारणा संस्थेच्या चालकांनी केली. ‘पगार’ हा विषय खेडगीकर यांच्यासारख्या ब्रह्मचाऱ्याला गौण होता. एन. एम. जोशी यांच्याकडे खेडगीकरांना दरमहा साठ रुपये मिळत असत. खेडगीकर  म्हणाले, 

“मला माझ्या दैनंदिन गरजांपेक्षा जास्त कशाचीही अपेक्षा  नाही. मी आजन्म ब्रह्मचारी असल्याने माझ्या मागे माझे कोणीही नाही.”

खेडगीकरांना दरमहा पन्नास रुपये देण्याचे संस्थेने कबूल केले. दर महिना हे मानधन त्यांच्या खात्यावर जमा होत असे. खेडगीकरांच्या गरजा इतक्या कमी होत्या की त्यांनी ते पैसे  फारसे कधी वापरलेच नाहीत. 

अतिशय लहान स्वरूपात सुरु झालेली ही शाळा थोड्याच अवधीत राज्यभरातील विद्यार्थ्यांचे एक आकर्षण बनली. ज्या पालकांना आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे असे वाटत असे ते आपल्या मुलांसाठी हिप्परग्याच्या शाळेत प्रवेश घेऊ लागले. हिप्परग्याची शाळा ही एक निवासी शाळा होती. शिक्षक आणि विद्यार्थी येथे एकत्र राहत असत. येथे विद्यार्थ्यांचे राहणीमान अतिशय साधे होते. त्यात कोणताही थाट, चमकधमक  नव्हती. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना राहण्यासाठी अतिशय साध्या झोपड्या बांधल्या होत्या. विद्यार्थी असो अथवा शिक्षक, त्यांची राहण्याची व्यवस्था सारखीच होती. खोल्यांची स्वच्छता राखण्यासाठी कोणी नोकर नव्हते. सारे काम विद्यार्थीच करत. दर रविवारी विद्यार्थी गावातून शेण गोळा करून आणत. सर्व झोपड्या आणि आवार शेणाने सारवून घेत असत. शिक्षकही विद्यार्थ्यांबरोबर शेण सारवण्याचे काम करत. प्रत्येक विद्यार्थ्याला एक खादीचा शर्ट आणि अर्धी चड्डी असा पोशाख असे. त्याबरोबर एक घोंगडी दिली जात असे. सकाळी उठल्यानंतर जागेची स्वच्छता करून त्याच ठिकाणी अभ्यासाचे वर्ग घेतले जात असत. अभ्यासाला खुर्च्या टेबल असा काही प्रकार नव्हता. विद्यार्थी आपापल्या घोंगड्या अंथरून त्यावर अभ्यासाला बसत. कित्येक वेळा अभ्यासाचे वर्ग झाडाखाली सावलीत भरत.

शाळेतील दिनचर्या अतिशय साधी होती. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक पहाटे साडेचारला उठत. पाच वाजता सामूहिक प्रार्थना होत असे. त्यानंतर विद्यार्थ्यांना आपापली कामे करण्यासाठी मोकळा वेळ दिला जात असे. आठ वाजता विद्यार्थ्यांना ज्वारीची भाकरी आणि दूध असा नाश्ता दिला जाई. त्यानंतर अभ्यासाच्या वर्गाला सुरुवात होई. दुपारपर्यंत वर्ग चालत. त्यानंतर जेवणाची सुट्टी होत असे. जेवणाच्या सुट्टीनंतर थोडी विश्रांती घेऊन पुन्हा दोन तास अभ्यासाचे वर्ग घेतले जात. सायंकाळी पाच वाजता विद्यार्थ्यांचा शारीरिक व्यायाम घेतला जात असे. संध्याकाळी सात वाजता प्रार्थना होई. विद्यार्थी रात्रीचे जेवण झाल्यानंतर रात्री साडे  नऊ पर्यंत झोपी जात. 

खेडगीकर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत असत. विद्यार्थ्यांचा केवळ बौद्धिकच नव्हे तर मानसिक आणि अध्यात्मिक विकास होणे आवश्यक आहे यावर त्यांचा भर होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर जीवनाच्या अथांग सागरात सहज लीलया क्रमण करण्याची क्षमता मुलांमध्ये निर्माण होण्याची आवश्यकता त्यांना भासत होती. पारंपरिक शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांचा केवळ बौद्धिक विकास केला जात असे. परंतु मानसिक विकास करण्याचे कोणतेच प्रयत्न या शिक्षण पद्धतीत नव्हते.

मुलांबरोबर खेडगीकरांची वर्तणूक अतिशय प्रेमाची आणि सहानुभूतीची असे. मुलांबरोबर ते एक मित्र किंवा सहकारी या नात्याने राहत. त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत. विद्यार्थ्यांच्या जीवनात एकजीव होण्यासाठी त्यांनी आपली राहणी अत्यंत साधी केली. त्यांनी चहा कॉफी इत्यादी पेयांचा त्याग केला. त्यांच्या स्वतःसाठी केवळ दोन घोगंड्या होत्या. एक झोपण्यासाठी आणि दुसरी अंगावर घेण्यासाठी. याशिवाय त्यांची अशी कोणतीही वस्तू नव्हती. खेडगीकर मुलांना कधीच शिक्षा करत नसत. एखाद्याने चूक केली तर त्याला सुधारण्याची संधी देत. एक विद्यार्थी वारंवार संधी देऊनही तो ती चूक करत राहिला. त्याला छडीचा मार देण्याचे खेडगीकर यांनी ठरवले. तीन छड्यांचे फटके दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी त्या मुलाला आपल्या मिठीत घेतले आणि ते लहान मुलासारखे रडू लागले. 

मुलांना छडीचा मार देऊन त्यांना शिक्षा करणे आपल्याला अशक्य आहे हे समजल्यानंतर त्यांनी एक नवा मार्ग अवलंबला. एखाद्या मुलाने चूक केली तर खेडगीकर उपोषण करत. एकदा एका मुलाने मोठी चूक केली. त्यावेळेस खेडगीकरांनी एक आठवडा उपवास केला. खेडगीकरांच्या उपवासानंतर विद्यार्थ्याने क्षमा मागितली आणि तसे वर्तन पुन्हा कधी केले नाही. 

एखादा विद्यार्थी आजारी असेल तर आईप्रमाणे ते त्याची सेवा करत. त्याला झोप लागावी म्हणून रात्रभर थोपटत. त्याच्यासाठी देशभक्तीपर गीत व कविता म्हणत. प्राथमिक औषधोपचाराचा अभ्यास देखील त्यांनी केला. खेडगीकरांनी विद्यार्थ्यांवर मनापासून प्रेम केले. सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी आपापल्या घरी जात. यावेळी सर्वांच्या डोळ्यात अश्रू असत. लवकर परतण्याचे आश्वासन देऊन ते एकमेकांचा निरोप घेत. खेडगीकरांच्या धकाधकीच्या जीवनातील त्यांचा हा सर्वात आनंदाचा काळ होता. 

खेडगीकर विद्यार्थ्यांमध्ये रमत. विद्यार्थ्यांच्या सेवेत त्यांना समाधान मिळत असे. परंतु स्वतःमध्येच शांती शोधण्याचा त्यांचा प्रयास कायम होता. दिवसभराचे काम संपल्यानंतर सायंकाळी ते जवळच असलेल्या एका ओढ्याशेजारी एकांतात बसत आणि वाहत्या पाण्याकडे कितीतरी वेळ निर्विकारपणे पाहत बसत. 

हिप्परग्यात काही अध्यात्मिक लोकांचा सत्संग चाले. त्याला ‘सेवक संघ’ म्हटले जाई. अनंतराव कुलकर्णी स्वतः या संघाचे प्रमुख होते. खेडगीकर त्या सत्संगाला जाऊ लागले. त्यांचा सहवास त्यांना आवडू लागला. ‘माणसाची सेवा हीच ईश्वरसेवा’ हे सत्संगाचे ब्रीदवाक्य होते. खेडगीकरांच्या सेवाभावी मनाला त्यांचे विचार पटू लागले. गावोगावचे साधू संत आणि संन्यासी येथे येत. त्यांच्या सहवासात खेडगीकर सुखावत. संन्यासी वृत्तीचा एक भाग म्हणून हे माधुकरी मागून आपला उदरनिर्वाह करत. खेडगीकरांनी देखील त्याचा अवलंब केला. ते गावात भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागले. स्वतःच्या संपत्तीचा त्याग त्यांनी केला. अध्यात्मिक विकासासाठी गुरुची अतिशय आवश्यकता असते. व्यक्तीला योग्य दिशा दाखवण्याचे काम गुरु करतो. परंतु गुरुचे काम प्रारंभी दिशा दाखवणे हेच असते. त्यानंतर ती व्यक्ती स्वतःच आपली गुरु असते. पुढील मार्गक्रमण त्याला स्वतःला करायचे असते.  

खेडगीकरांनी स्वामी रामतीर्थांचे “इन वुड्स ऑफ गॉड  रियलायझेशन” या ग्रंथाचे चार खंड वाचले होते. स्वामी रामतीर्थांच्या विचारांनी खेडगीकर प्रभावित झाले होते. स्वामी रामतीर्थ हे पंजाब प्रांतातील अतिशय महान आणि ज्ञानी पुरुष. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस आपल्या मंत्रमुग्ध वाणीने भारतातच नव्हे तर अमेरिका, जपान, इजिप्त इत्यादी देशांतही  त्यांनी आपल्या विचारांचा प्रभाव पाडला. फारसी, इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि संस्कृत भाषेत ते अस्खलित प्रवचन करत. पुढे त्यांनी आपले वास्तव्य ऋषिकेश पासून पाच मैल अंतरावर गंगा नदीच्या किनारी ‘ब्रह्मपुरी’च्या जंगलात हलवले. तेथेच त्यांना दैवी साक्षात्कार झाला. १९०६ मध्ये स्वामी रामतीर्थांनी गंगेत जलसमाधी घेतली. रामतीर्थ यांचे विचार, व्याख्यान इत्यादी एकत्र करून समाजासमोर आणण्यासाठी त्यांचे शिष्य श्री. नारायण स्वामी यांनी ‘रामतीर्थ पब्लिकेशन लीग’ या संस्थेची स्थापना केली आणि “इन वुड्स ऑफ गॉड रियलायझेशन” या ग्रंथाचे प्रकाशन केले. 

रामतीर्थ यांच्या कोणीतरी अनुयायाला गुरु मानावे असा निश्चय खेडगीकरांनी केला. गुरूच्या शोधात खेडगीकरांनी रामतीर्थ पब्लिकेशन यांना पत्र लिहिले. त्यात नारायण स्वामींची चौकशी त्यांनी केली. कर्मधर्मसंयोगाने खेडगीकरांचे पत्र नारायण स्वामींच्याच हाती पडले. आपण केंव्हाही येऊन भेटू शकता असा संदेश नारायण स्वामींनी उत्तरादाखल पाठवला. उत्तर मिळताच खेडगीकर लखनौला पोहोचले. १९३१ चा मे महिना होता.  खेडगीकर नारायण स्वामी यांना प्रथम भेटले. खेडगीकरांनी दहा दिवस नारायण स्वामींच्या सानिध्यात घालवले. अनेक विषयांवर चर्चा केली. खेडगीकरांनी नारायण स्वामींना विनंती केली,

“स्वामीजी, मला संन्यास घेण्याची मनस्वी इच्छा आहे. आपल्या विचारांनी मी प्रभावित झालो आहे. यासाठी लागणारे पुरेसे गुण माझ्यात आहेत असे आपल्याला वाटत असेल तर मला आपला अनुयायी स्वीकारून संन्यासत्वाची दीक्षा द्यावी अशी माझी इच्छा आहे.”

नारायण स्वामी खेडगीकरांच्या निर्धाराने प्रभावित झाले आणि खेडगीकरांना म्हणाले,

“तुम्ही प्रथम बनारस, अयोध्या, प्रयाग आणि ब्रम्हपुरी या स्थळांना भेट द्यावी आणि नंतर त्यांना हरिद्वारमध्ये परत भेटावे. तुमचा निश्चय पक्का झाला असेल तर आपण याविषयी चर्चा करू.”

नारायण स्वामींचा सल्ला मानून खेडगीकर या सर्व स्थळांची तीर्थयात्रा करून त्यानंतर हरिद्वारमध्ये हजर झाले. नारायण स्वामींनी त्यांचे स्वागत केले. खेडगीकर संन्यास घेण्याच्या निश्चयावर अटळ आहेत हे पाहून त्यांनी खेडगीकरांना दीक्षा देण्याचे मान्य केले. खेडगीकर मनोमन सुखावले. काही चर्चेनंतर त्यांनी हिप्परगा येथे येऊन संक्रांतीच्या दिवशी दीक्षा सोहळा पूर्ण करण्याचे मान्य आले. नारायण स्वामींच्या लखनौ आणि हरिद्वार येथील सहवासात खेडगीकर यांना नारायण स्वामींचे व्यक्तिमत्व जवळून पाहता आले. उंच आणि बळकट शरीरयष्टीचे नारायण स्वामी अतिशय विद्वान तर होतेच परंतु मनाने अतिशय मोकळ्या स्वभावाचे होते. त्यांचे राहणीमान अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित असे. ते दिवसात अठरा तास काम करीत. त्यांना आळशीपणाचा तिटकारा होता. अनेक सामाजिक आणि शिक्षण संस्थांशी ते संलग्न होते. ध्येयाने प्रेरित असून देखील मानसिक दृष्ट्या ते या साऱ्या पासून अलिप्त होते. खेडगीकर यांना त्यांच्यात खरा कर्मयोगी दिसला. 

संक्रातीआधी एक आठवडा नारायण स्वामी हिप्परग्याला येऊन पोहोचले. दोघात अनेक विषयांवर अध्यात्मिक चर्चा झाल्या. स्वामी रामतीर्थ यांच्या बाबत अनेक किस्से खेडगीकरांना ऐकायला मिळाले. रामतीर्थ यांची शिकवणूक खेडगीकरांनी पुढे न्यावी ही नारायण स्वामींची इच्छा होती.  १४ जानेवारी १९३२; संक्रांतीचा तो दिवस. नजीकच्या ओढ्याशेजारी असलेल्या औदुंबराच्या झाडाची ‘दीक्षा स्थान’ म्हणून नारायण स्वामींनी निवड केली. कोणतेही सोपस्कार नसतील आणि हा अतिशय साधा सोहोळा असेल असे नारायण स्वामींनी सांगितले. त्यांनी खेडगीकरांना मुंडन करण्यास सांगितले. यापुढे सारे विश्व हेच तुमचे कुटुंब असेल असे सांगून खेडगीकरांकडून ‘ओम’ चा जप करवला.  त्यानंतर दोघेही ओढ्यात शिरले. नारायण स्वामींनी खेडगीकरांचे हात हातात घेतले आणि दोघांनी पाण्यात तीन डुबक्या घेतल्या. बाहेर आल्यानंतर नारायण स्वामींनी खेडगीकरांना भगवी वस्त्रे दिली. आणि त्यानंतर म्हणाले, “आजपासून तुम्हाला जग स्वामी रामानंद तीर्थ या नावाने ओळखेल”