भाग - १ (1903-1934) 






"मालक आणि कामगार यांच्या संघर्षात वेळीच समेट घडवणे आवश्यक आहे. अन्यथा त्यातून कामगारांचे हित तर सध्य होतच नाही परंतु देशाचे नुकसान मात्र होते."

५. कामगार युनियन (1926-1929)

व्यंकटेशाचे पुण्यातील शिक्षण संपत आले होते. त्याच सुमारास व्यंकटेशसमोर एक चांगली संधी चालून आली.   भारतातील कामगार चळवळीचे जनक श्री. एन. एम. जोशी यांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी एका तरुणाची आवश्यकता होती. असा तरुण निवडण्यासाठी जोशी यांनी एक नावीन्यपूर्ण  कल्पना आखली. त्यांनी इच्छुक तरुणांकडून ‘भांडवल आणि श्रमिक यांच्यातील संबंध’ या विषयावर निबंध आमंत्रित केले होते. व्यंकटेशने आपला निबंध जोशी यांच्याकडे पाठवला. आलेल्या सर्व निबंधात व्यंकटेशचा निबंध सरस ठरला आणि एन. एम. जोशी यांनी व्यंकटेशला आपल्याकडे कामाला ठेवून घेतले. 

वयाच्या तेविसाव्या वर्षी, एप्रिल १९२६ मध्ये व्यंकटेश ‘बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन’चा उप-संघटक म्हणून कामावर रुजू झाला. व्यंकटेश आता त्याच्या आडनावाने म्हणजे ‘खेडगीकर’ म्हणून ओळखला जाऊ लागला.  

मुंबईमध्ये कुर्ल्यातील गिरणी कामगारांचे संघटन आणि मध्यवर्ती कार्यालयाचे कामकाज सांभाळण्याची जबाबदारी खेडगीकर यांच्यावर सोपवण्यात आली. 

काम सांभाळताना खेडगीकर यांना कामगार आणि कारखान्याचे व्यवस्थापन यांच्या अनेकविध समस्यांना सामोरे जावे लागले. 

मुंबईमधील मिल व्यवस्थापन आणि कामगार यांच्या संघर्षाच्या सुरुवातीचा तो काळ होता. सर्वसामान्य कामगार अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जगत होता. बहुतांश कामगार अंधाऱ्या आणि दमट अशा खोल्यांतून राहात असत. एका लहानश्या खोलीत चार ते पाच कुटुंबे एकत्र राहायची. कामगारांचे सामान्य राहणीमान अतिशय हलाखीचे आणि दयनीय होते. परंतु उदरनिर्वाहासाठी मुंबईत आलेल्या या कामगारांपुढे  या शिवाय कोणताही उपाय नव्हता. खेडगीकर यांचे मन कामगारांची दयनीय परिस्थिती पाहून उद्विग्न होत असे. खेडगीकर रात्री उशिरापर्यंत त्यांच्या झोपडपट्टीत राहत  आणि त्यांचे दुःख समजावून घेण्याचा प्रयत्न करत आणि केवळ झोपण्यापुरते आपल्या खोलीवर येत. 

याउलट मिलचे व्यवस्थापन याबाबत अतिशय बेफिकीर होते. त्यांच्या दृष्टीने कामगार आणि त्यांचे श्रम ही खरेदी करण्याची वस्तू होती. खेडगीकर यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत असे. जाचाला कंटाळून कधी कामगार दंगा करत. यावर त्यांची विचारपूस न करता व्यवस्थापन पोलिसांना पाचारण करत असे. अशा वेळी  खेडगीकर यांना बोलावणे येत असे. खेडगीकर घटनास्थळी धावत जात असत आणि कामगार आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये तात्पुरता समेट घडवून आणत. खेडगीकर कामगारांच्या हितासाठी मनापासून काम करत. यात त्यांना मनस्वी आनंद होत असे. 

गरीब आणि श्रीमंत या वर्गवारीत विभागलेल्या या समाजाबाबत खेडगीकर खोलवर विचार करत. गरीब कामगारांना कोणतेही अधिकार नव्हते. त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देखील नव्हता. आपली मर्जी फिरल्यास कोणत्याही कामगाराला कामावरून काढून टाकण्याचा अधिकार मालकाला होता. महिला मजुरांना वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात असे. या तक्रारी खेडगीकर यांच्याकडे वारंवार येत असत. व्यवस्थापनासमोर याचा विरोध केल्यास अधिक सूडाने ते कामगारांवर अत्याचार करत. या परिस्थितीत देखील कामगारांना न्याय मिळवून देण्याची पराकाष्ठा खेडगीकर करत. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत ‘बॉम्बे टेक्सटाइल लेबर युनियन’चे नाव झाले. 

याच काळात खेडगीकर यांचा काही नामवंत कामगार नेत्यांशी संबंध आला. त्यापैकी एक होते एस. एच. झाबवाला. खेडगीकर व झाबवाला अनेकवेळा एकत्रित कामगार सभा घेत. खेडगीकर त्यांना रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक श्रमिक साप्ताहिक संपादित करण्यास मदत देखील करत. 

अव्याहत काम करण्याची झाबवाला यांची क्षमता खेडगीकर यांना प्रभावित करत असे. झाबवाला स्वतः पारशी असूनही, ते कामगार सभेत त्यांना मराठीत संबोधित करत.  त्यांच्या गुजराती उच्चारातील मराठीची खेडगीकरांना मोठी गंमत वाटे. झाबवाला यांच्याव्यतिरिक्त एफ. जे. गिनवाला, आर. आर. बखले यांच्या संपर्कात देखील खेडगीकर आले. या कामगार नेत्यांकडून खेडगीकर  यांना खूप काही शिकायला मिळाले. 

श्री. एन. बी. शकलातवाला एक ज्येष्ठ कामगार नेते होते. एक भारतीय या नात्याने ते ब्रिटिश संसदेवर देखील होते. खेडगीकर मुंबईमध्ये काम करत असताना शकलातवाला यांनी मुंबईला भेट दिली. दोन दिवसांच्या त्यांच्या भेटीत त्यांच्या स्वागताची आणि त्यांच्या कार्यक्रमांची जबाबदारी खेडगीकर यांच्यावर होती. त्यांच्या भाषणातून आणि चर्चेतून खेडगीकर यांना बरेच काही शिकायला मिळाले. 

एन. एम. जोशी यांच्याकडूनही खेडगीकरांना खूप काही शिकायला मिळाले. समाजात त्यांचा फार मोठा आदर केला जाई. जोशी अतिशय पुरोगामी मतांचे होते. तसेच ते विचारांनी राष्ट्रवादी होते. केंद्रीय विधानसभेचे ते नामनिर्देशित सदस्य देखील होते. जोशी दिवसातले सोळा ते अठरा तास काम करत. एखाद्या गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय ते कोणाताही सल्ला देत नसत. त्यामुळे त्यांच्या मतांना समाजात फार मान होता. राजकारण्यांची कामगार चळवळीतील लुडबुड जोशी यांना मान्य नव्हती. जोशी यांचे विचार आणि त्यांची कार्यप्रणाली खेडगीकर आत्मसात करीत होते. 

आठ ते नऊ महिने मुंबईत कामगार संघटनेचे काम केल्यानंतर  जानेवारी १९२७ मध्ये श्री. एन. एम. जोशी यांनी खेडगीकर यांना दिल्लीला बोलावले. देशात कामगार कायदे करण्यात जोशी यांचा सहभाग होता.  यासाठी साहित्य गोळा करण्यासाठी जोशींना सहाय्यकाची आवश्यकता होती. जोशींच्या सांगण्यावरून खेडगीकर दिल्लीला रवाना झाले. 

भारताच्या राजधानीची ही खेडगीकर यांची पहिलीच भेट होती. खेडगीकर यांना ‘ज्ञानप्रकाश’ या पत्रकाचे वार्ताहर म्हणून संसदेच्या गॅलरीचा पास देण्यात आला. कायदेमंडळाचा कारभार पाहण्याचा योग  खेडगीकरांना आला. मोतीलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली ‘स्वराज पक्ष’ विरोधी पक्ष म्हणून काम करत होता. विठ्ठलभाई पटेल अध्यक्ष  म्हणून काम पाहत होते. लाला लजपत राय, जयकर, सत्यमूर्ती अशा बऱ्याच राष्ट्रीय नेत्यांची भाषणे खेडगीकर यांना ऐकायला मिळाली. 

परंतु दिल्लीतील दोन ते तीन महिन्याच्या अल्प वास्तव्यातच  खेडगीकर यांना अतिशय वाईट परिस्थितीला तोंड द्यावे लागले. त्यांच्या शरीराच्या खालच्या भागात त्यांना काहीसा सुन्नपणा जाणवू लागला. खेडगीकरांना दिल्लीची थंडी आणि गार वारा बाधला. याचा त्यांच्या पाठीचा कणा आणि मज्जासंस्थेवर परिणाम झाला होता. त्यांना चालणेही कठीण होऊ लागले. खेडगीकरांनी जोशी यांच्याकडे मुंबईला परत जाण्याची परवानगी मागितली. खेडगीकरांची अवस्था पाहून जोशींनी ती  ताबडतोब मान्य केली. 

खेडगीकरांनी ताबडतोब मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. आग्ऱ्याला ताजमहाल पाहण्याची खेडगीकरांची इच्छा होती. तेवढे आटोपून ते मुंबईला परतले. मुंबईला पोहोचताच मुंबई मधील प्रसिद्ध न्युरॉलॉजिस्ट डॉ. कॉन्ट्रॅक्टर यांना ते भेटले.  त्यांनी तपासणी केली आणि खेडगीकरांना काही औषधे लिहून दिली. परंतु त्याचबरोबर मुंबई सोडून जाण्याचा सल्ला दिला. मुंबईची हवा त्यांना मानवणार नाही हे त्यांनी निक्षून सांगितले. 

खेडगीकर पूर्णपणे अपंग झाले होते. आजार कमी होण्याचे नाव घेत नव्हता. उलट त्यात वाढ होतानाच दिसत होती. हा आजार संपूर्णपणे बरा होणाऱ्यातला नाही आणि त्याची वाढ कमीत कमी व्हावी हेच प्रयत्न आपल्या हातात आहेत असा इशारा डॉक्टरांनी त्यांना दिला. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे खेडगीकर काटेकोरपणे पालन करत होते. परंतु प्रकृतीत सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नव्हती. स्वतःला देशसेवेला अर्पण करण्याच्या ईर्षेने प्रेरित झालेल्या खेडगीकरांच्या मनावर याचा काय परिणाम झाला असेल याची कल्पना करणे देखील कठीण आहे. 

खेडगीकर यांना आजारातून बाहेर पडण्याची तीव्र इच्छा होती. आपले देशसेवेचे व्रत पूर्ण करण्याची त्यांची मनोमन इच्छा होती. युनानी उपचार करून पहावेत असा काहींनी सल्ला दिला. त्यांनी ते करूनही पहिले. परंतु त्याचा त्रासच त्यांना अधिक झाला. खेडगीकरांनी आयुर्वेदाचे उपचार करण्याचे ठरवले. यासाठी ते पुण्यात आले. पुण्यातील प्रसिद्ध आयुर्वेद पारंगत वैद्यांनी त्यांच्यावर उपचार केले. आजारात थोडाफार उतार पडण्याची चिन्हे दिसू लागली. आजारात त्यांच्या मित्रांनी त्यांना खूप मदत केली. उपचारांचा खर्च सारे मित्रच करत होते. पुढील सहा महिने उपचार चालू होते. 

परंतु प्रकृती पुन्हा बिघडण्याची चिन्हे दिसू लागली. दिवसेंदिवस ते ग्लानीत बिछान्यात पडून असत. एके दिवशी तर त्यांची शुद्ध हरपली. अनेकांनी त्यांच्या जगण्याची आशा सोडून दिली. परंतु मित्रांनी जिद्द सोडली नाही. त्याकाळी अहमदनगर येथे एक चांगले आयुर्वेदिक इस्पितळ होते. सर्व मित्रांनी खेडगीकरांना अहमदनगर येथे हलवले. डॉक्टरांनी पराकाष्ठा केली. नियतीच्या मनात पुढे जाऊन खेडगीकर यांच्या हातून फार मोठी देशसेवा व्हावी असे होते. उपचारांना यश येऊन त्यांची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. पुढच्या आठ महिन्यात कमालीची सुधारणा होऊन काठीच्या सहाय्याने चालण्यापर्यंत खेडगीकर यांची प्रगती झाली. 

असे म्हणतात की आजारपण व्यक्तीला केवळ क्लेश देते असे नाही. कित्येकदा ते व्यक्तीमध्ये काही चांगले बदल देखील घडवून आणते. खेडगीकर यांच्या बाबतीत असेच काहीसे झाले. अठरा महिन्याच्या दीर्घ आजारात खेडगीकरांना आत्मचिंतनाला भरपूर वेळ मिळाला. मृत्यूची भीती त्यांच्या मनातून पार पळाली. एकांताचा उपयोग आत्मपरीक्षण आणि चिंतनासाठी कसा करता येऊ शकतो याची जाणीव त्यांना झाली. व्यक्ती म्हणजे त्याचे शरीर नसून त्याचा शुद्ध आत्मा असतो. निस्वार्थ भावनेने समोरच्या व्यक्तीची आणि समाजाची सेवा करण्यातच अंतरात्म्याला आनंद मिळतो या निःस्वार्थ भावनेने खेडगीकर प्रेरित झाले. 

ऑगस्ट १९२८ मध्ये खेडगीकरांना अहमदनगरच्या आयुर्वेदिक इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला. खेडगीकरांची प्रकृती पूर्ववत झालेली नसली तरी स्वतःची सर्व कामे आपली आपण स्वतः करण्याइतपत ते ठीक झाले होते. उपचार संपले होते. नैसर्गिकरित्या शरीराची ताकद हळूहळू वाढणार होती.  शारीरिकदृष्ट्या अपंग असूनही, ते मानसिकदृष्ट्या एक मजबूत व्यक्ती म्हणून आजारातून उठले होते.

त्यांच्या संभाव्य डिस्चार्जची बातमी एन. एम. जोशी यांना कळवण्यात आली. पुन्हा कामावर रुजू व्हावे अशी इच्छा त्यांनी खेडगीकरांसमोर पत्राद्वारे व्यक्त केली. परंतु मुंबईचे हवामान आणि तेथील धकाधकीचे जीवन आता मानवणार नाही या सबबीवर त्यांनी त्यास नकार दिला. त्या काळी जोशी सोलापुरातील कापड गिरणीतील कामगारांचे नेतृत्व करत होते. खेडगीकरांनी त्यांना सोलापूरला राहून गिरणी कामगारांच्या संघर्षाचे नेतृत्व करावे असा सल्ला दिला. जोशींच्या सल्ल्याला मान देऊन खेडगीकरांनी आपला मुक्काम सोलापुरास हलवला. 

सोलापूर येथील गिरणी कामगार आणि मालक यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला होता. दोन्ही पक्षात कोणतीही तडजोड होण्याची चिन्हे दिसत नव्हती. खेडगीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कामगारांच्या अनेक सभा घेतल्या. मालकांशी बोलणी करून तोडगा काढण्याचे प्रयत्न देखील केले. परंतु या मध्यस्तीला फारसे यश आले नाही. कामगारांनी बेमुदत संपाची घोषणा केली. खेडगीकर यांना संपाचे प्रभारी नेमण्यात आले. संप चार महिने चालला. शेकडो कामगार स्वयंसेवक म्हणून दाखल झाले. संपाचे स्वरूप अतिशय शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध होते. परंतु मालकाच्या हस्तकांनी काही कामगारांना हिंसाचारास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. मालकाच्या हेतूची कल्पना खेडगीकरांनी कामगारांना दिली. सुरवातीला कामगारांना ते पटले आणि ते हिंसाचारापासून दूर राहिले. परंतु हस्तकांनी आपले प्रयत्न चालू ठेवले आणि अखेर त्यांना त्यांच्या दुष्कार्यात यश आले. संपाचे रूपांतर दंगे आणि हिंसाचारात बदलले. मालकांनी पोलीस यंत्रणेला पाचारण केले. अनेक कामगारांना आणि कामगार नेत्यांना अटक झाली. त्यात खेडगीकरांना देखील अटक झाली. त्यांच्यावर खटला चालवला गेला आणि त्यांना अल्प मुदतीचा तुरुंगवास ठोठावला गेला. 

खेडगीकर तुरूंगातून बाहेर आले परंतु तोपर्यंत मालकाला कामगारांत फूट पाडण्यात यश आले होते. सर्व कामगार वर्ग एकत्रित राहिला नव्हता. पुन्हा जुन्या जोमाने संघर्ष उभारणे आता शक्य नव्हते. समोर दिसणारी परिस्थिती पाहून खेडगीकर निराश झाले. कामगार समस्या हाताळताना त्यावर तोडगा काढण्याची अचूक वेळ आणि संधी हेरणे आणि त्यावर वेळीच अमल करणे अतिशय महत्वाचे असते याची जाणीव खेडगीकरांना झाली. ती वेळ निघून गेल्यानंतर कामगारांच्या हाती काहीच राहत नाही. 

तुरुंगातून परतल्यावर खेडगीकर कामगार संघटनेच्या कामात परत रुजू झाले. १९२९ मधील मेरठ कटाच्या प्रसिद्ध खटल्यात अनेक कम्युनिस्टांना अटक करण्यात येत होती. त्यात खेडगीकर यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली. संपाच्या काळात केलेल्या प्रक्षोभक भाषणांचा तो कदाचित असर असावा. परंतु खेडगीकर हे जोशी यांचे सहकारी असल्याने त्यांच्या सरळ हेतूवर सरकारचा विश्वास बसला आणि त्यांना अटक झाली नाही. 

पुढे अजून सहा महिने खेडगीकरांनी अनेक प्रयत्न केले. परंतु संघटनेला म्हणावे तसे यश मिळेना. त्यांचे या कामात मन रमेना. अखेर खेडगीकरांनी एन. एम. जोशी यांना नोकरीतून मुक्त करण्याची विनंती केली.