भाग - १ (1903-1934) 





सत्याच्या शोधात अहिंसा मूलभूत असते. अहिंसेच्या आधाराशिवाय केलेला सत्याचा शोध हा व्यर्थ असतो. एखाद्या अयोग्य पद्धतीचा प्रतिकार करावा पण त्या पद्धतीचा अवलंब करणाऱ्याचा प्रतिकार करणे अयोग्य आहे. 

 ३.  असहकार आंदोलन (1916-1921)

१९२० च्या उत्तरार्धात असहकार आंदोलनाने जोर पकडला. असहकार चळवळीचा एक भाग म्हणून सरकारी शिक्षण संस्थांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा करण्यात आली. सरकारी शाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या शाळा सोडून राष्ट्रीय शाळांतून प्रवेश घ्यावा असे आवाहन असहकार चळवळीद्वारे गांधीजींनी केले. 

व्यंकटेश सरकारी हायस्कूल मध्ये मॅट्रिकच्या शेवटच्या वर्गात शिकत होता. विद्यार्थ्यांना ‘गांधी टोपी’ वापरण्यास सक्त मनाई होती. खरे तर ही हातमागावर विणलेली सर्वसाधारण पांढरी टोपी होती. परंतु त्याचे नाव ‘गांधी टोपी’ असल्याने सरकारी अधिकाऱ्यांचा त्यावर राग होता. व्यंकटेश आणि त्याच्या काही मित्रांनी असहकार आंदोलनाला पाठिंबा म्हणून काही कार्यक्रम आखण्याचे ठरवले. त्यांच्यापैकी जवळपास दोनशे विद्यार्थी एकत्र भेटले. प्राथमिक भाषणे झाल्यानंतर गांधी टोपी घालून दुसऱ्या दिवशी वर्गात जाण्याचा निर्णय सर्वांनी घेतला. लगेच सर्वांनी पांढऱ्या टोप्या खरेदी केल्या. दुसऱ्या दिवशी सारे विद्यार्थी गांधी टोपी घालून वर्गात हजर झाले.  मुख्याध्यापकांना हा प्रकार काळाला तेव्हा ते एक लांबलचक छडी घेऊन वर्गात आले. कडक आवाजात त्यांनी  मुलांना  टोप्या काढायला सांगितल्या. व्यंकटेश मोठ्या आत्मविश्वासाने उभा राहिला आणि मुख्याध्यापकांना म्हणाला, 

“गुरुजी, गांधी टोपी घालण्यात काहीच गैर नाही. यात आम्ही शाळेचा कोणताही नियम मोडत नाही. तेव्हा आम्ही टोप्या काढणार नाही.”

मुख्याध्यापकांनी व्यंकटेशला आणि टोपी घालून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना चांगलाच छडीचा प्रसाद दिला. साऱ्यांनी तो आनंदाने स्वीकारला. या साऱ्या प्रकाराने व्यंकटेशचा आत्मविश्वास मात्र द्विगुणित झाला. 

विद्यार्थ्यांनी मॅट्रिकच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा एक ‘युवा क्लब’ तयार केला. विद्यार्थी दर आठवड्याला भेटायचे.  राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाषणे, चर्चा आणि वादविवाद करायचे. व्यंकटेशने एकेदिवशी ‘शिवाजी आणि रामदास’ यांच्याबद्दल माहिती देऊन त्यांच्याकडून आपल्याला काय शिकता येईल याबाबत भाषण केले. या चर्चांना पुढे जोर येऊन सर्वांनी राष्ट्राच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचे ठरवले आणि शाळा सोडून राष्ट्रीय चळवळीत सामील होण्याचा निर्णय घेतला. आपल्या कार्याला वेग यावा या उद्देशाने सोलापुरात विद्यार्थ्यांचे एक संमेलन भरवण्याचे ठरले. सरकारी शाळांवर बहिष्कार टाकून या शाळांतून आपली नावे काढून घेण्याची प्रतिज्ञा या संमेलनात घेण्याचे सर्वानुमते ठरले. विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी पुण्याचे न. चिं. केळकर अध्यक्ष  म्हणून आमंत्रित करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना राष्ट्रीय मुक्तीसाठी विद्यार्थ्यांनी कोणती भूमिका बजावणे अपेक्षित आहे यावर भर दिला. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांपैकी कोणी बोलावे अशी इच्छा व्यक्त केली. कोणीच उठेना हे पाहून व्यंकटेशने  आपला हात वर केला आणि बोलण्याची इच्छा व्यक्त केली. व्यासपीठावर जाऊन व्यंकटेशने आत्मविश्वासाने भाषण केले. शाळा सोडून मातृभूमीच्या सेवेसाठी स्वतःला अर्पून देण्याचा निर्धार व्यंकटेशने भर सभेत बोलून दाखवला. हीच प्रतिज्ञा इतर विद्यार्थ्यांनी देखील करावी असे आवाहन व्यंकटेशने केले. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून व्यंकटेशाचे कौतुक केले. परंतु संमेलनात जमलेल्या विद्यार्थ्यांपैकी इतर  कोणीही प्रतिज्ञा घेण्यासाठी पुढे आले नाही.

कार्यक्रम संपला. व्यंकटेश ध्येयाने प्रेरित झाला होता. शाळा सोडून देशसेवेस स्वतःला अर्पण करण्याच्या भावनेने तो प्रफुल्लित झाला होता. परंतु त्याच्या मित्रांनी त्याला  प्रतिज्ञा मागे घेण्याचा सल्ला दिला. भावनेच्या भरात  व्यंकटेशने चुकीचा निर्णय घेऊ नये अशी कळकळीची विनंती त्यांनी व्यंकटेशला केली. थोरामोठ्यांनी देखील हाच सल्ला व्यंकटेशला दिला. परंतु व्यंकटेश आपल्या निर्णयावर ठाम राहिला. मुख्याध्यापकांच्या सल्ल्यालाही न जुमानता आपल्या निर्णयाला पक्के राहून व्यंकटेशने शाळा सोडली हे आपण यापूर्वीच पहिले आहे. व्यंकटेशने हा निर्णय भावनेच्या भरात घेतला नव्हता. देशातील बदलते राजकीय प्रवाह आणि व्यंकटेशाचे असीम देशप्रेम यांचा तो परमोच्च बिंदू होता. व्यंकटेशला देशसेवेचा कोणताही अनुभव नव्हता. आपल्या ध्येयपूर्तीसाठी ठोस असा आराखडा व्यंकटेशकडे नव्हता. परंतु आपण योग्य दिशेने जात आहोत असा दृढ विश्वास मात्र व्यंकटेशला होता. 

लोकमान्य टिळक यांच्याबद्दल  व्यंकटेशला जसा आदर होता तसाच आदर त्याला गांधीजी यांच्याबद्दल देखील होता. परंतु व्यंकटेशने त्यांना कधी पाहिले नव्हते. केवळ घराघरांतून टांगलेल्या गांधीजींच्या फोटोफ्रेममधून आणि वर्तमानपत्रातून व्यंकटेशने त्यांचे चित्र पाहिले होते. एकदा महात्मा गांधी दक्षिणेतून मुंबईला जाताना सोलापूरमधून जात असल्याची माहिती व्यंकटेशला मिळाली. गांधीजींचे दर्शन घेण्यासाठी रेल्वेस्थानकावर जाण्याचे व्यंकटेशने ठरवले. गांधीजी यांचे ‘दर्शन’ होणार या कल्पनेने त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. ठरल्याप्रमाणे तो स्टेशनवर गेला. पूर्ण प्लॅटफॉर्म दर्शनाला आलेल्या लोकांनी  खचाखच भरलेला होता. गांधीजींचे चरणस्पर्श करण्याची व्यंकटेशची  इच्छा होती. परंतु फलाटावरची गर्दी पाहून व्यंकटेश हिरमुसला झाला. या गर्दीत गांधीजींच्या जवळ पोहोचण्याची शक्यता खूपच कमी होती. परंतु व्यंकटेशचे नशीब बलवत्तर होते. गांधीजी ज्या डब्यात बसले होते तो डबा व्यंकटेश उभा होता तिथे समोरच थांबला. फारशी अडचण न येता व्यंकटेश गांधींच्या जवळ पोहोचला आणि त्याने त्यांना वाकून नमस्कार केला. गांधीजींनी व्यंकटेशला थोपटले आणि म्हणाले,

“देश स्वतंत्र होईपर्यंत विश्रांती घेऊ नका”

सरकारी शाळा सोडून व्यंकटेश राष्ट्रीय विद्यापीठाच्या मॅट्रिकच्या परीक्षेला बसला हे आपण पाहिलेच आहे. आता व्यंकटेश इतर कोणतेही काम करायला मोकळा होता. व्यंकटेशने सोलापुरातील काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधून काही काम देण्याची विनंती केली. हे काम तो ‘विनावेतन’ करणार आहे हे देखील त्याने स्पष्ट केले. त्या काळी असहकार मोहीम जोरात चालू होती. काँग्रेसचे कार्यकर्ते गावोगाव जाऊन याबाबत लोकजागृती करत असत. व्यंकटेशने या कामात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी काँग्रेसच्या कार्यालयातून या अर्थाचे ओळखपत्र देण्याची विनंती व्यंकटेशने केली. तेथील अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे पत्र तर दिलेच, परंतु हे काम तो कसे करू शकेल याबाबत काही सल्ला देखील दिला. 

ओळखपत्र घेऊन व्यंकटेश गावोगावी फिरू लागला. गावातील मोक्याच्या ठिकाणी उभे राहून व्यंकटेश भाषण करू लागला. परदेशी कपड्यांवर बहिष्कार घालण्यापासून ते सविनय कायदेभंग आणि कर भरण्यास नकार देण्यापर्यंत सर्व मुद्दे व्यंकटेश आपल्या भाषणात मांडू लागला. आपल्या बोलण्याचा लोकांवर किती परिणाम होत आहे याचा विचार न करता मन लावून तो ते पटवून देण्याचा आपल्या परीने प्रयत्न करू लागला. संध्याकाळी राहण्यासाठी व्यंकटेशला आसरा देण्यासाठी गावकरी राजी नसत. यातून ब्रिटिश सरकारचा रोष पत्करावा लागेल अशी रास्त भीती लोकांना होती. अशा परिस्थितीत व्यंकटेश रात्री देवळाच्या पारावरच रात्र काढीत असे. माधुकरी मागून उदरनिर्वाह करत असे. परंतु याने व्यंकटेश खचला नाही. त्याने आपला मार्गक्रम चालू ठेवला. 

व्यंकटेश जो उपदेश करत होता तो ‘कायदा आणि सुव्यवस्थे’च्या दृष्टीने ‘देशद्रोह’ होता याची त्याला जाणीव होण्यासारखी घटना अखेर घडली. एकेदिवशी काही लोकांना बरोबर घेऊन व्यंकटेश असहकार चळवळ याबाबत त्यांना माहिती देत होता. तेवढ्यात तेथे एक पोलिस शिपाई येऊन पोहोचला. तो येताच सारी माणसे तेथून पसार झाली. पोलिस शिपायाने व्यंकटेशला चौकीवर नेले. तेथील पोलिस अधिकाऱ्याने व्यंकटेशला धमकी वजा सल्ला दिला. तो जे करत आहे ते ताबडतोब थांबवून त्याने घरी परत जावे हे त्याने व्यंकटेशला निक्षून सांगितले. तसे  न केल्यास व्यंकटेशला अटक होईल अशी धमकीही दिली. व्यंकटेशला काय करावे ते कळेना.  नाईलाजाने व्यंकटेश सोलापुरात परतला. त्याने सारा प्रकार काँग्रेस नेत्यांना सांगितला. त्यांनी  हा उपक्रम काही काळासाठी बंद करण्याचा सल्ला व्यंकटेशला दिला. 

दरम्यान व्यंकटेशचा मॅट्रिकचा निकाल लागला. व्यंकटेश मॅट्रिक उत्तीर्ण झाला. पुढील शिक्षण घ्यावे की स्वतःला देशसेवेसाठी अर्पण करावे या द्विधा मनस्थितीत व्यंकटेश होता. व्यंकटेशला असहकार आंदोलनातील प्रचारात आलेला अनुभव पाहता व्यंकटेशच्या लक्षात आले की समाजापुढे जाण्याआधी त्याला बरीच जास्त तयारी करावी लागेल. आपल्या म्हणण्यास समाजाने रास्त प्रतिक्रिया द्यावयाची असेल तर आपल्याला पुढील शिक्षण घेणे आणि स्वतःला अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. अखेर व्यंकटेशने पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.

असहकार आंदोलनातून व्यंकटेश काही काळाकरता बाहेर पडला असला तरी त्याला यात बरेच काही शिकायला मिळाले. जीवनाला एक नवी दिशा मिळाली.