भाग - १ (1903-1934) 





"आपल्या हातून एखादे पाप घडले आहे हे न कळणे हेच मोठे पाप आहे. आपण पाप केले आहे याची कबुली देणे हेच त्यावर खरे प्रायश्चित्त आहे. या तत्वाचा मी अंगीकार केला आणि माझे आयुष्य शुद्ध होत गेले."


१. बालपण (1903-1920) 

हैदराबाद संस्थानाची निजामशाहीतून मुक्तता आणि स्वतंत्र भारतात विलीनीकरण यात मोलाचे योगदान असणाऱ्या ‘स्वामी रामानंद तीर्थ’ यांचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भवानराव खेडगीकर. 

व्यंकटेशचा जन्म ३ ऑक्टोबर १९०३ रोजी कर्नाटकातील सिंदगी येथे भवानराव खेडगीकर यांच्या घरात झाला. व्यंकटेशाचे वडील भवानराव तर आई यशोदाबाई. भवानराव सिंदगी येथे कानडी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते. सिंदगी हे गाव महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरील विजापूर जिल्ह्यातले. त्यामुळे बहुतांशी लोकांना कानडी आणि मराठी दोन्ही भाषा अवगत  होत्या. खेडगीकर यांचे घर देखील याला अपवाद नव्हते. व्यंकटेशची मातृभाषा कानडी असली तरी व्यंकटेशवरील संस्कार कानडी आणि मराठी या दोन्ही भाषांतून झाले. 

भवानराव संसारात असूनही स्वभावाने विरक्त होते. त्यांना संन्यस्त जीवनाचे अतिशय आकर्षण होते. मोठी गंगाबाई व दुसरी यमुनाबाई या दोन मुली आणि नंतर अण्णाराव या मुलाला जन्म दिल्यानंतर भवानरावांनी संसाराचा त्याग केला. आपल्या पत्नी यशोदाबाई यांच्या इच्छेविरुद्ध भवानरावांनी संन्यास घेतला. परंतु भवानरावांच्या गुरूंना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी भवानरावांना संसारात परत जाण्याचा सल्ला दिला. मोठ्या अनासक्तीने भवानरावांनी संसारधर्म स्वीकारला. संसारात परतल्यानंतर भवानरावांना तुंगाबाई, कमलाबाई, व्यंकटेश आणि भीमराव अशी चार अपत्ये झाली. विठ्ठलपंतांनी असाच संसारत्याग करून गुरूच्या सांगण्यावरून संसारात पुनःप्रवेश केला होता. संसारात परतल्यावर त्यांच्या पोटी ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. पुढे जाऊन ज्ञानेश्वरांनी साऱ्या मानवजातीला अजरामर असा अध्यात्माचा ठेवा दिला. व्यंकटेश हा देखील एक  ‘संन्याश्याचे पोर’. त्याच्याही हातून ‘फूल ना फुलाची पाकळी’ असो, परंतु काही महान कार्य घडण्याचे जणू दैवयोगात होते. 

भवानराव संसारात परतले होते परंतु वेदांत आणि अध्यात्म यापासून दूर झाले नव्हते. शाळेचे कामकाज संपल्यानंतर भवानराव आपला काळ अध्यात्मिक वाचनात घालवत. गावातील समविचारी लोकांना घरी बोलावून त्यांच्याशी अध्यात्मिक चर्चा करत. भजन, कीर्तन, प्रार्थना यात समरस होत. बाळ व्यंकटेशला या साऱ्याचा अर्थ कळत नसे परंतु वडिलांच्या वर्तनाने तो प्रभावित होत होता. भजनांच्या ठेक्यावर व्यंकटेश तल्लीन होत असे. भवानराव ध्यानाला बसत तेव्हा तासनतास व्यंकटेश त्यांच्या प्रसन्न चेहेऱ्याकडे पाहत बसे. साधू-संन्यासी आणि एकांतवास याबद्दल व्यंकटेशला कमालीचे आकर्षण वाटू लागले. गावात एखादा संन्यासी किंवा बैरागी आले की व्यंकटेश त्यांच्याबरोबर वेळ घालावीत असे. त्यांनी पेटवलेल्या धुनीशेजारी तासनतास बसे. ते काय बोलतात याचे संपूर्ण आकलन व्यंकटेशला होत नसे. परंतु तरी देखील त्यांच्याबरोबर तो रमत असे. आपणही असेच काहीतरी करावे असे त्याला मनोमन वाटे. 

नदीकिनारी एकांतात वेळ घालवण्याचा छंद व्यंकटेशला होता. एक दिवस असाच व्यंकटेश नदीकिनारी गेला.  नदीचा प्रवाह शांतपणे वाहात होता. बाजूलाच एक साधू ध्यानस्थ स्थितीत बसला होता. व्यंकटेशची नजर त्या साधूकडे गेली. साधूने ध्यानस्थ अवस्था धारण केली होती. त्याचे मिटलेले डोळे पाहून जणू तो गाढ  निद्रेत आहे असा  भास होत होता. चोहोबाजूस निःशब्द शांतता होती. वाहत्या पाण्याचा आवाजही त्या निःशब्द वातावरणास साथ देत होता. व्यंकटेश त्या साधू समोर जाऊन बसला. त्या ध्यानस्थ साधूकडे बघण्यात किती वेळ गेला हे व्यंकटेशला कळलेही नाही. थोड्या वेळाने त्या साधूने सावकाश आपले डोळे उघडले. समोर व्यंकटेशला पाहून साधूच्या चेहेऱ्यावर स्मित पसरले. साधू म्हणाला, 

“बोल मुला, तू कोण आहेस? इथे कशाकरता आला आहेस? मी तुझ्यासाठी काही करू शकतो का?” 

बराच वेळ व्यंकटेश काहीच बोलला नाही. व्यंकटेश त्या साधूच्या चेहेऱ्याकडे प्रसन्नपणे पाहात होता. अखेर भानावर आल्यावर व्यंकटेश पुटपुटला, 

“स्वामीजी, मला तुमच्यासारखे संन्यासी व्हावयाचे आहे” 

साधू आपल्या जागेवरून उठला. व्यंकटेशकडे स्मित करून त्याने पाहिले. आपला आशीर्वादाचा हात पुढे केला आणि म्हणाला, “तथास्तु”. क्षणातच साधू वळला आणि आपल्या वाटेने चालू लागला. व्यंकटेश त्या पाठमोऱ्या साधूकडे तो दिसेनासा होईपर्यंत पाहत राहिला. 

साधू-संन्यासी यांच्याबद्दल व्यंकटेशला खूप आकर्षण होते. परंतु धार्मिक कर्मकांडावर व्यंकटेशचा विश्वास नव्हता. देवळात जाणे, पूजाअर्चा इत्यादीत व्यंकटेशला काडीमात्र रस नव्हता. लहान वयात धार्मिक ग्रंथ, पुराण, यांचे फारसे वाचन देखील व्यंकटेशने केले नाही. एखाद्या नास्तिकाप्रमाणे व्यंकटेशाची वागणूक होती. 

या संदर्भात व्यंकटेश बाबत घडलेली एक मजेशीर गोष्ट आहे. स्वामी माधवाचार्य सोलापुरातील उत्तराधिमठात उतरले होते. त्यांनी आरंभलेल्या होमात सहभागी होण्यासाठी त्यांचे कुटुंब व्यंकटेशला घेऊन सोलापुरात दाखल झाले. होमात सहभागी झाल्याने शुद्धी होते हा त्या साऱ्यांचा समज. परंतु यावर व्यंकटेशचा विश्वास नव्हता. त्याने मठात येण्यास साफ नकार दिला. परंतु घरचे त्याला मठात नेण्यासाठी अडून बसले. जेव्हा साऱ्याचा अतिरेक झाला तेव्हा व्यंकटेशने घरच्यांना सांगितले, “जर तुम्ही मला माझ्या विरुद्ध मठात नेले तर मी माधवाचार्यांना सांगेन की मला मठात येऊन शुद्धीकरण करून घेण्यावर अजिबात विश्वास नाही.” अखेर घरातल्या मंडळींनी व्यंकटेश वाया गेला असे समजून व्यंकटेशचा नाद सोडला. 

भवानरावांची आर्थिक परिस्थिती सामान्यच होती. सात मुलांच्या शिक्षणाचा भार त्यांच्या मिळकतीला परवडणारा नव्हता. त्यात व्यंकटेश सात-आठ वर्षांचा असताना भवानरावांची पत्नी वारली. व्यंकटेशच्या जन्माआधीच त्यांच्या मोठ्या दोन मुली गंगाबाई आणि यमुनाबाई यांचा विवाह झाला होता. गंगाबाईंचे लग्न गुलबर्गा जिल्ह्यातील गाणगापूर येथील एक पुजारी नरहरभट यांच्याशी झाले होते. नरहरभटांची आर्थिक परिस्थिती बरी होती. नरहरभटांनी आपल्या मेव्हण्याला म्हणजे अण्णारावला शिक्षणासाठी आपल्याजवळ ठेवून घेतले होते. अण्णारावने मॅट्रिक झाल्यानंतर रेल्वेत कारकुनाची नोकरी धरली. पुढे नरहरभटांनी व्यंकटेश आणि इतर मुलांना देखील गाणगापुरी आणले. धाकटा भीमराव शिक्षण पूर्ण करून मोमिनाबाद येथे स्थायिक झाला. ‘श्री. योगेश्वरी नूतन विद्यालय’ प्रशालेत शिक्षक म्हणून रुजू होऊन तेथेच पुढे मुख्याध्यापक झाला. 

व्यंकटेशचे सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण सिंदगी येथे झाले. पुढे नरहरभटांनी व्यंकटेशला गाणगापूरला आणल्यानंतर त्याचा प्रवेश गावातल्या प्राथमिक शाळेत केला. तेथेच त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. व्यंकटेशचे चुलते रामभाऊ खेडगीकर त्याकाळी रेल्वेत नोकरीला होते. त्यांची बदली सोलापूर येथे झाली. रामभाऊंनी व्यंकटेशच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची तयारी भवानरावांना बोलून दाखवली आणि पुढील शिक्षणासाठी त्याला सोलापूरला घेऊन आले. 

रामभाऊ ‘रेल्वे कामगार संघात’ सक्रिय भाग घेत असत. रेल्वे कामगार संघाचे पुढारी म्हणून त्यांचा बोलबाला होता. त्यात त्यांचा बराचसा वेळ जात असे. त्यातून रामभाऊंची नोकरी बदलीची होती. या सर्वाचा व्यंकटेशच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून रामभाऊंनी व्यंकटेशला ‘नॉर्थकोट हायस्कूल’ नावाच्या सरकारी शाळेत इंग्रजी दुसरी मध्ये प्रवेश देववला आणि शाळेला जोडून असलेल्या वसतिगृहात त्याला दाखल केले. रामभाऊंचीही आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे ते व्यंकटेशला फारशी आर्थिक मदत करू शकत नसत. रामभाऊंनी व्यंकटेशला शाळेत नादारी मिळवून दिली. वसतिगृहातही सवलत मिळवून दिली. इतर खर्च भागवण्यासाठी व्यंकटेश शाळेच्या ग्रंथालयात आणि खानावळीत वरची कामे करू लागला. 

व्यंकटेश शरीरयष्टीने कमकुवतच होता. शरीर कमावण्याच्या दृष्टीने व्यंकटेश फारसा व्यायाम देखील करत नसे. व्यंकटेशला क्रिकेटची आवड होती. परंतु स्वतः क्रिकेट खेळण्यापेक्षा अंपायर म्हणून नाव कमावण्यात त्याला रस होता. अभ्यासात मात्र व्यंकटेश चांगला होता. इंग्लिश भाषेत तर व्यंकटेश वर्गात सहसा पहिला असे.

व्यंकटेशच्या बालमनात रूजलेल्या संन्यस्त वृत्तीचा आविष्कार  लहानपणापासूनच पाप-पुण्याच्या कल्पनेच्या रूपात त्याच्या आचारा-विचारांतून व्यक्त होत होता. आपल्या हातून कोणतेही पाप घडू नये असे व्यंकटेशला मनस्वी वाटे आणि त्यासाठी त्याचे पावलागणिक प्रयत्न असत. आपण मनाने दुबळे आहोत आणि आपल्याकडून पाप  घडते अशा विचारांनी या काळात व्यंकटेशच्या मनाला ग्रासून टाकले.  आपणाकडून पाप घडू नये याबदल तो सदैव  दक्षता बाळगत असे. चहा पिणे, मित्रात खोटे बोलणे, सिनेमाला जाणे, हॉटेलात जाणे अशा किरकोळ गोष्टीही व्यंकटेशच्या दृष्टीने पापाचरणात मोडणाऱ्या होत्या.  

हायस्कुलात शिकत असतानाच व्यंकटेशची एकनाथ गोडबोले नावाच्या वर्गमित्राशी मैत्री झाली. व्यंकटेश आपले अंतरंग या मित्राजवळ उघडे  करीत असे. एकनाथसारख्या मित्रांसोबत राहिल्यास आपणाकडून पाप घडणार नाही असे त्याला वाटे आणि असे आचरण आपल्याकडून घडले असे जर वाटले तर त्याची कबुली एकनाथजवळ दिल्याशिवाय व्यंकटेशला स्वस्थता लाभत नसे. दुर्दैवाने एकनाथने आपली शाळा बदलली आणि व्यंकटेशाचा त्याच्याशी संपर्क कमी झाला. थोड्या काळाने का होईना, व्यंकटेश एकनाथला आवर्जून भेटत असे आणि आपल्या चुकांची कबुली देत असे. कबुली दिल्यानंतर व्यंकटेशचे मन हलके होत असे. 

व्यंकटेश सोलापुरात शिकत असताना देशात महत्वाच्या घडामोडी घडत होत्या. देशात स्वातंत्र्याचे वारे वेगाने वाहू लागले होते. गांधीजींचे निर्विवाद नेतृत्व राष्ट्रीय काँग्रेस आणि देशातील बहुसंख्य जनतेने मान्य केले होते. १९२० साली गांधीजींनी असहकार चळवळीची घोषणा केली. असहकार चळवळीचा एक भाग म्हणून सरकारी शिक्षण संस्थांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा करण्यात आली. सरकारी शाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या शाळा सोडून राष्ट्रीय शाळांतून प्रवेश घ्यावा असे आवाहन असहकार चळवळीद्वारे गांधीजींनी केले. भावुक मनाच्या व्यंकटेशवर  या साऱ्याचा परिणाम झाला नसता तरच नवल होते. सोलापुरात भरलेल्या एका सार्वजनिक सभेत व्यंकटेशने सरकारी शाळा सोडण्याची प्रतिज्ञा घेतली. 

व्यंकटेशचे मॅट्रिकचे अखेरचे वर्ष होते. चाचणी परीक्षा झाली होती आणि व्यंकटेशचे आवेदन पत्र बोर्डाकडे पाठवले होते. व्यंकटेशने भावनेच्या भरात जाऊन शाळा सोडू नये असा सल्ला व्यंकटेशच्या काही मित्रांनी व इतर काही वयस्क मंडळींनी दिला. व्यंकटेश शाळेतील एक हुशार विद्यार्थी होता. त्यांनी व्यंकटेशला बोलावून घेतले. मुंबई मॅट्रिक परीक्षेस बसावे यासाठी मुख्याध्यापकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परीक्षेला बसण्यासाठीचा खर्च देखील देण्याची तयारी दाखवली. परंतु मुख्याध्यापकांचा आग्रह व्यंकटेशने मानला नाही. व्यंकटेशने निक्षून सांगितले,

“मी देवासमोर आणि सर्वांसमोर प्रतिज्ञा घेतली आहे ती मी पाळणारच” 

रामभाऊंनी मात्र व्यंकटेशच्या भावनांचा आदर केला. त्याला जो निर्णय योग्य तो त्याने घ्यावा असा प्रेमाचा सल्ला त्यांनी दिला. मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा देण्याऐवजी व्यंकटेशने ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’ची मॅट्रिकची परीक्षा दिली आणि वयाच्या सतराव्या वर्षी, १९२० साली व्यंकटेश मॅट्रिक परीक्षा पास झाला.