भाग - १ (1903-1934) 





“योग्य गुरू लाभल्यास त्याच्याकडून मिळणारी  प्रेरणा इतर कोणाकडूनही मिळणार नाही. परंतु गुरूंने आपला पूर्ण ताबा घेऊ नये. गुरु म्हणजे केवळ मार्गदर्शक होय. तो वाट दाखवतो आणि तुम्हाला मोकळे सोडून देतो. गुरुची भूमिका ही तत्कालीक आहे. शेवटी तुम्हालाच तुमचे गुरु बनले पाहिजे.”

४. महाविद्यालयीन शिक्षण (1921-1926)

व्यंकटेश ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’ची मॅट्रिकची परीक्षा पास झाला. स्वतःला देशकार्यास वाहून घ्यावे की पुढील शिक्षणाची वाट धरावी या संभ्रमात अखेर व्यंकटेशने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. जुलै २०२१ मध्ये व्यंकटेशने  खानदेशातील अमळनेर येथील ‘खानदेश एजुकेशन सोसायटी’ने चालवलेल्या राष्ट्रीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. व्यंकटेशच्या भावी आयुष्यात महत्वाचे ठरलेले त्याचे वैयक्तिक कौशल्य अमळनेर येथील त्याच्या पुढील दोन वर्षाच्या वास्तव्यात त्याने आत्मसात केले. 

व्यंकटेशला आवश्यक असलेल्या विकासासाठी या राष्ट्रीय महाविद्यालयाचे वातावरण अतिशय अनुकूल होते. संस्थेच्या आवारात चोहोकडे देशभक्तीचे वातावरण होते. सेवा आणि त्यागाच्या भावनेने प्रेरित असलेले प्रख्यात शिक्षक संस्थेमध्ये अध्यापनासाठी रुजू झाले होते.  श्री. जे. जी. गुणे संस्थेचे प्राचार्य होते. श्री गुणे यांनी पुढे जाऊन स्वामी कुवलयानंद या नावाने लोणावळा येथे ‘कैवल्यधाम’ ही योग शिक्षण देणारी संस्था स्थापन केली. श्री. गुणे ब्रह्मचारी होते. तसेच ते  अत्यंत धार्मिक देखील होते. गुणे अतिशय विद्वान आणि योगविद्या पारंगत तर होतेच परंतु स्वतः अतिशय उत्तम वक्ता होते. गुणे स्वभावाने अतिशय प्रेमळ आणि शांत स्वभावाचे होते. महाविद्यालयाला लागून एका लहानशा झोपडीत ते राहत असत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा व्यंकटेशवर खोलवर प्रभाव झाला. 

व्यंकटेशला ब्रह्मचारी जीवन जगायचे होते. गुणे यांच्यामध्ये व्यंकटेश आपला एक आदर्श पाहू लागला. परंतु गुणे यांचे अवलोकन केल्यानंतर व्यंकटेशला प्रथमतः स्वतःबाबत कमीपणाची भावना निर्माण झाली. ब्रह्मचर्याचा अर्थ केवळ शारीरिक संबंधांपासून दूर राहणे असा नसून हृदयाची शुद्धताही अतिशय महत्वाची असते. आपण मनाने शुद्ध नाही आणि आपल्या हातून पापे घडतात असे व्यंकटेशला वाटत  असे. ‘मग आपण गुणे यांच्यासारखी अध्यात्मिक पातळी कशी गाठणार?’ या विचाराने व्यंकटेशच्या मनाची चलबिचल होत असे. 

महाविद्यालयाची इमारत शहरापासून काहीशी दूर होती. त्यामुळे महाविद्यालयाच्या आवाराला एकांताचे पावित्र्य लाभले होते. सर्व विद्यार्थी  वसतिगृहात शुद्ध आणि साधे जीवन जगत. विद्यार्थ्यांची संख्याही अत्यल्प होती. व्यंकटेशच्या वर्गात केवळ  एकोणतीस विद्यार्थी होते. सर्व विद्यार्थी एकाच कुटुंबातील सदस्यांसारखे राहत असत.  विद्यार्थ्यांना त्यांच्या समोर ठेवलेल्या मार्गापासून विचलित करण्यासारखे त्या वातावरणात काहीही नव्हते. प्रत्येकजण दुसऱ्याला मदत करण्यास उत्सुक असे. गरज पडेल तेव्हा एकमेकांना धैर्य देण्यास सर्व विद्यार्थी तत्पर असत. 

स्वतःला पवित्र करण्यासाठी आपण सखोल आत्मशोध केला पाहिजे आणि स्वतःमध्ये डोकावून त्यातील त्रुटी शोधून त्या दूर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे असे गांधीजी सांगत. यासाठी उपवास आणि प्रार्थना हा एकमेव मार्ग असल्याचेही ते सांगत. या उपदेशाने प्रेरित होऊन व्यंकटेश अनेकवेळा उपवास करीत असे. व्यंकटेश महिन्यात किमान सहा दिवस संपूर्ण उपवास करीत असे. यातून त्याला आत्मशांतीची प्रचिती येते असा त्याचा ठाम विश्वास होता. 

व्यंकटेश अध्यात्मिक वाचन करू लागला. व्यंकटेशला एकदा गीतेची प्रत मिळाली. व्यंकटेशने धार्मिक भावनेने त्याचे रोज पठण सुरु केले. आपल्या गीता पठणाच्या उपक्रमाबाबत व्यंकटेशने एकदा प्राचार्य गुणे यांना सांगितले. यावर त्याचा अर्थ समजून घेऊन ते वाचावे असा सल्ला गुणे यांनी दिला. व्यंकटेशने त्यांचा सल्ला मानला आणि अर्थ समजावून घेऊन गीता वाचन केले. यातून व्यंकटेशला कमालीची मनःशांति मिळाली. 

वर्गाचे तास सोडले तर व्यंकटेश वाचन आणि मनन करत असे. व्यंकटेशने ज्ञानेश्वरी, तुकाराम, रामदास वाचले. बालपणी नास्तिक असलेला व्यंकटेश अखेर आध्यात्मिक आणि धार्मिक बनला. स्वतःशी प्रामाणिक राहण्याची वृत्ती व्यंकटेशमध्ये निर्माण झाली. व्यंकटेशने रस्किन आणि टॉलस्टॉय यांचे लेखन देखील चवीने वाचले. त्यातूनही व्यंकटेशच्या विचारांना आकार मिळाला. 

महाविद्यालयात असताना व्यंकटेशचा दिनक्रम पहाटे साडेतीन वाजता सुरू होत असे. प्रातर्विधी आटोपून चार वाजता थंड पाण्याने आंघोळ करून व्यंकटेश गीता पठणाला बसत असे. नंतर कबीर, तुलसी, सूरदास आणि मोरोपंत इत्यादींसारखे वाचन करत असे. सकाळी नऊ वाजता वसतिगृहात जेवणाची घंटा होत असे. तोपर्यंत व्यंकटेशाचे वाचन चालू असे. दिवसभर महाविद्यालयात घालवल्यानंतर व्यंकटेश संध्याकाळी व्यायाम करत असे. संध्याकाळी खोलीत परत आल्यावर व्यंकटेश नियमित रोजनिशी लिहीत असे आणि लवकर झोपी जात असे. 

अमळनेर येथे काही कौशल्य व्यंकटेशने आत्मसात केली त्यापैकी वक्तृत्व हे एक महत्वाचे होते. येथेच व्यंकटेश एक चांगला वक्ता बनला. काही विद्यार्थी नियमित एकत्र येऊन आपल्या वक्तृत्व गुणांना वाव देत असत. त्यात व्यंकटेश आवडीने भाग घेत असे. प्रत्येक विद्यार्थ्याला दर आठवड्याला सर्वांसमोर बोलायची संधी मिळत असे. व्यंकटेश आपल्या भाषणाआधी विषयाचा संपूर्ण अभ्यास करत असे. विषयाच्या नोंदी करत असे आणि मगच भाषणाला उभा राहत असे. हळूहळू व्यंकटेश एक चांगला वक्ता बनला. फावल्या वेळात व्यंकटेश महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वाचन करण्यात वेळ घालवत असे. ग्रंथालय अनेक विषयांवरील पुस्तकांनी परिपूर्ण होते. व्यंकटेश केवळ वाचनच करीत नसे तर आपल्या वहीत त्यांच्या नोंदी देखील करीत असे. याने विषय आत्मसात करण्यात मदत होते असा व्यंकटेशाचा विश्वास होता. 

काही विद्यार्थ्यांनी मिळून एक मासिक सुरु केले. व्यंकटेश मासिकाचा संपादक झाला. मासिक हस्तलिखितातच निघत असे. मासिकात संपादकीय लिहिण्याची जबाबदारी अर्थातच व्यंकटेशाची होती. तात्विक, अध्यात्मिक अशा अनेक विषयांवर व्यंकटेश आपले मत त्यातून मांडत असे. आपले विचार कागदावर योग्य प्रकारे उतरवून वाचकांसमोर ठेवण्याचे कौशल्य व्यंकटेश यातून शिकला. 

महाविद्यालयाचे प्राचार्य गुणे यांनी  महाविद्यालयात  राबवलेला एक स्तुत्य उपक्रम म्हणजे स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण. महाविद्यालयात एक स्वयंसेवक गट तयार केला होता. हा गट नियमितपणे गणवेश घालून कवायत करत असे. या स्वयंसेवक गटाला लाठ्यांनी प्रतिकार करण्याचे प्रशिक्षण दिले जाई. पटांगणात सामूहिकरीत्या देशभक्तीपर कविता आणि प्रार्थना म्हटल्या जात असत. 

त्याच सुमारास बार्डोली येथील असहकार चळवळीने जोर धरला. १९२१ मध्ये अहमदाबाद येथे राष्ट्रीय काँग्रेसची  वार्षिक परिषद भरली. सी. आर. दास यांना कलकत्त्यात अटक झाल्याने त्यांच्याजागी परिषदेचे अध्यक्षस्थान हकीम अजमल खान यांच्याकडे आले. सरदार वल्लभभाई पटेल यांची स्वागत समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ब्रिटिशांनी काँगेसच्या मागण्यांकडे लक्ष देण्यास नकार दिल्यास संपूर्ण सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करण्याचा प्रस्ताव गांधीजींनी मांडला. या बैठकीत गांधींची एकमेव नेता म्हणून निवड झाली. 

अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक नेते अमळनेरला येऊन गेले. व्यंकटेशला या नेत्यांची भाषणे ऐकायला मिळाली. सी. आर. दास यांच्या भाषणाने व्यंकटेश अतिशय प्रभावित झाला. कस्तुरबांचे दर्शन देखील याच सुमारास व्यंकटेशला झाले. असहकार चळवळीत पूर्णवेळ सहभागी होण्याचे आवाहन गांधीजींनी देशातील विद्यार्थ्यांना केले. अमळनेर महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी एक वर्षासाठी महाविद्यालयीन शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला. एकदा अभ्यासात व्यत्यय आला की विद्यार्थ्यांना परत महाविद्यालयात येणे कठीण होईल, तेव्हा विद्यार्थ्यांनी हा निर्णय घेऊ नये असा सल्ला शिक्षकांनी दिला. परंतु विद्यार्थी कोणतीही किंमत मोजायला तयार होते. ते आपल्या निर्णयावर कायम होते.

याच सुमारास फेब्रुवारी १९२२ मध्ये उत्तर प्रदेशातील चौरीचौरा येथे एक दुर्दैवी घटना घडली. मांसाच्या किमती वाढल्याच्या विरोधात लोकांनी आंदोलन उभारले. ४ फेब्रुवारी १९२२ रोजी सुमारे २,५०० लोक चौरीचौरा मार्केटच्या दिशेने निघाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी काही नेत्याला अटक केली. त्यांच्या सुटकेचे आवाहन करण्यासाठी जमाव पोलीस स्टेशनला पोहोचला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. यात तिघांचा मृत्यू झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. जमावाने चौकीवर दगडफेक केली आणि चौकीला आग लावली. यात २२ पोलिसांचा मृत्यू झाला. या प्रकाराने गांधीजींचे मन उद्विग्न झाले. दुखवटा म्हणून त्यांनी पाच दिवसांचा उपवास केला. या घटनेमुळे असहकार आंदोलन मागे घेण्याचा निर्णय गांधीजींनी घेतला. गांधीजींच्या निकटवर्तीयांनी गांधीजींचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. परंतु गांधीजी आपल्या निर्णयाशी ठाम राहिले. 

शिक्षण बाजूला ठेऊन देशकार्यास सर्वस्व अर्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अवसानघात झाला. विद्यार्थी अनिच्छेने का होईना   परंतु महाविद्यालयीन शिक्षणात  परत आले. याच दरम्यान इंग्रजांनी कायद्याचे हात अधिक बळकट केले. अनेक राष्ट्रीय शिक्षण संस्था बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले. बंद होणाऱ्या संस्थांच्या यादीत व्यंकटेश शिकत असलेले अमळनेरचे  महाविद्यालय देखील होते. दोन वर्षांचे अमळनेरमधील व्यंकटेशाचे वास्तव्य अचानक संपुष्टात आले. अनेकांनी सरकारी शिक्षण संस्थांमध्ये परत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु व्यंकटेशला हे मान्य  नव्हते. त्याने पुणे येथील राष्ट्रीय शिक्षण संस्थेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. 

अमळनेर येथील राष्ट्रीय संस्था बंद पडल्याने व्यंकटेशने  पुण्यातील ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’त प्रवेश घेतला. अमळनेर आणि पुणे या महाविद्यालयातील अभ्यासक्रमात बराच फरक होता. याचा विचार करून पुण्यातील महाविद्यालयाने व्यंकटेशासाठी विशेष वर्ग चालू केले. व्यंकटेशचा अभ्यास पुण्यातील अभ्यासक्रमाशी जुळून येईपर्यंत हे चालू राहिले. 

अमळनेर मध्ये व्यंकटेशचा आध्यात्मिक विकास झाला तर पुण्यात त्याचा बौद्धिक विकास झाला. व्यंकटेशला अनेक पाश्चात्य विचारवंतांचे लेखन वाचायला मिळाले. नेहमीच्या सवयीप्रमाणे व्यंकटेश त्याच्या नोंदी देखील करत असे.  व्यंकटेशला ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया’ सोसायटीच्या समृद्ध ग्रंथालयात आणि ‘केसरी’ आणि ‘मराठा’ कार्यालयातील ग्रंथालयात प्रवेश मिळाला. त्यातून त्याला अनेक प्रकारचे वाचन करण्याची संधी मिळाली. वाचण्यासाठी पुस्तकांची निवड व्यंकटेश अतिशय विचारपूर्वक करत असे. व्यंकटेश दिवसाचा प्रत्येक क्षण बौद्धिक विकासासाठी वापरत असे. त्याच बरोबर व्यंकटेशने शरीर सुदृढ करण्यासाठीही मनापासून प्रयत्न केले. त्याने बलदंड असे शरीर कमावले नाही परंतु सर्वसामान्याला पूरक असे आरोग्य आणि शरीरयष्टी कमावली.

पुण्यात आल्यावर एक वर्षाने व्यंकटेशने ‘वाङ्मय विशारद’  ही पदवी संपादन केली. पुढे त्याने टिळक विद्यापीठातच राजनीती शास्त्रात ‘वाङ्मय पारंगत’ उपक्रमात प्रवेश घेतला. १९२६ मध्ये दोन वर्षांच्या अभ्यासानंतर ‘इव्होल्यूशन ऑफ डेमोक्रसी’ नावाचा प्रबंध लिहून व्यंकटेशने ‘वाङ्मय पारंगत’ ही पदवी संपादन केली. सरकारी अभ्यासक्रमाच्या MA पदवीस ही समतुल्य पदवी होती.  पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना व्यंकटेश गांधीजींच्या संपर्कात आला. याच काळात व्यंकटेश गांधीजींच्या व्यक्तिमत्वाने अतिशय प्रभावित झाला. गांधीजी येरवडा तुरुंगात असताना त्यांना अपेंडिक्स झाल्याने पुण्यातील ससून इस्पितळात दाखल केले होते. १२ जानेवारी १९२४ रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर काही काळ प्रकृती सुधारण्यासाठी ते  इस्पितळातच होते. 

त्याच सुमारास मौलाना मोहम्मद अली पुण्यात आले. दुपारी विद्यार्थ्यांना संबोधित करून संध्याकाळी ते गांधीजींची विचारपूस करण्यासाठी इस्पितळात जाणार होते. त्याकाळी व्यंकटेश ‘विद्यार्थी संघटने’चा अध्यक्ष होता. त्यामुळे अलींच्या व्यवस्थेची जबाबदारी त्याच्याकडेच होती. भाषण संपल्यावर व्यंकटेश त्यांच्यासोबत इस्पितळात गेला. अली गांधीजींना भेटायला त्यांच्या खोलीत जात असताना व्यंकटेशने आपण देखील दर्शनाला आत येण्याची इच्छा व्यक्त केली आणि अलींनी ती मान्य केली. व्यंकटेशच्या आनंदाला पारावर उरला नाही. अली खोलीत गेल्यानंतर त्यांनी गांधीजींच्या पायावर डोके ठेवले. त्यांना अश्रू अनावर झाले. गांधीजींनी प्रेमाने अलींना समजावले. ते दृश्य पाहणारा व्यंकटेश देखील सद्गतीत सद्गझाला सद्गदित झाला. त्याच्या मनावर याचा खोलवर परिणाम झाला. गांधीजींना जवळून अनुभवण्याचा आणखी एक प्रसंग व्यंकटेशला आला. गांधीजींची तुरुंगातून सुटका झाल्यावर सप्टेंबर १९२४ मध्ये त्यांना महाविद्यालयात विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यासाठी बोलावण्यात आले. मंचावरील व्यवस्थेचे काम व्यंकटेशवर सोपवण्यात आले. कार्यक्रमाचे वेळी व्यंकटेश पूर्णवेळ गांधीजींबरोबर मंचावर होता. व्यंकटेश डोळे भरून गांधीजींकडे पहात होता आणि त्यांची प्रतिमा हृदयात साठवत होता. संध्याकाळी गांधीजींची जाहीर सभा झाली. पुण्यात गांधीजींची तुलना टिळकांबरोबर केली जात असे.  याचा परामर्ष गांधीजींनी आपल्या भाषणात केला.  याबाबत बोलताना गांधीजी म्हणाले, “मी एक नम्र पाईक आहे आणि लोकमान्य ही एक थोर विभूती होती.”

गांधीजींचे त्या दिवशीचे भाषण ‘न भूतो न भविष्यति’ असे भावनिक झाले. बोलताना स्वतः गांधीजींच्या डोळ्यात अनेक वेळा अश्रू आले. सर्व श्रोतेगण सद्गदित झाले. श्रोत्यांत बसलेल्या व्यंकटेशला अश्रू अनावर झाले. व्यंकटेशने मनोमन प्रतिज्ञा केली, “मी पुनरुच्चार करतो कि मी देशसेवाला संपूर्ण वाहून घेईन. मी यापासून कदापि विचलित होणार नाही.”